आम्हाला पैसे नकोत! लस द्या, मुलांना वाचवा!! मेंदूज्वराने तडफडणाऱ्या बालकांना घेऊन आईवडिलांचा अमित शहांसमोर टाहो

एसएसपीई या दुर्मिळ मेंदूज्वराने राज्यातील हजारो बालकांना विळखा घातला आहे. उपचारासाठी पैसे नसल्याने पालक हतबल झाले आहेत. मेंदूज्वराने तडफडणाऱया लेकरांना घेऊन आज ते थेट सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले. परंतु मुख्यमंत्र्यांची भेट न झाल्याने त्यांनी सह्याद्रीबाहेरच मिंध्यांच्या नावाने आक्रोश केला. आम्हाला पैसे नकोत, लस द्या, मुलांना वाचवा असे म्हणत त्यांनी अक्षरशः टाहो पह्डला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी मुंबईत आले होते. त्यांचा मुक्काम सह्याद्री अतिथीगृहावर होता. आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना भेटण्यासाठी सह्याद्रीवर गेले होते. त्याचवेळी मेंदूज्वरग्रस्त बालकांना घेऊन त्यांचे आईवडील सह्याद्रीवर पोहोचले होते. मुख्यमंत्र्यांना भेटण्याची विनंती त्यांनी केली. परंतु अमित शहांसोबत आगामी निवडणुकीच्या चर्चेत दंग झालेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी त्या गरीब पालकांची भेट घेतली नाही. मुख्यमंत्र्याच्या पीएने त्यांची भेट घेऊन मदतीचे केवळ तोंडी आश्वासन देत काढता पाय घेतला.

धावणारा मुलगा जागेवर पडलाय हो, उपचार करा

उर्मिला चव्हाण यांचा मुलगा देवांश हा एसएसपीई मेंदूज्वरामुळे बेडवर पडला आहे. त्याची अवस्था सांगताना उर्मिला यांचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. देवांशला एकाएकी ताप भरून आकडी आली, त्याला बोलता येत नाही, शरीर वाकडे झाले आहे. डॉक्टर म्हणाले, डोक्यात ताप गेलाय. धावणारा मुलगा जागेवर पडलाय हो… उपचार करा एवढीच मागणी आहे, असे त्या म्हणाल्या.

औषधाला पैसे नाहीत, काय करू…

सातवीत शिकणारा मुलगा एसएसपीई मेंदूज्वराने अचानक बेडवर पडल्याने बेलकर कुटुंबीय चिंतेत आहेत. औषधासाठीही आता पैसे उरलेले नाहीत अशी व्यथा त्याची आई जया बेलकर यांनी मांडली. दर महिन्याला उपचारासाठी 25-30 हजार रुपये खर्च आहे. सरकारने या आजारावर लवकर औषध शोधावे एवढीच मागणी आहे. तोपर्यंत तरी आमच्या मुलांना सांभाळा, अशी विनंती त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांची भेट न झाल्याने निराश पालकांनी आजारी बालकांना फुटपाथवर ठेवून तिथेच आंदोलन केले. आपल्या मुलांची अवस्था पाहून त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. आम्हाला पैसे नकोत, आमच्या मुलांना सुदृढ आरोग्य द्या अशा भावना त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केल्या. मुलांना औषध आणायला पैसे नाहीत. हसतीखेळती मुले लाखो रुपये खर्च करूनही बेडवर आहेत, असे त्यांनी सांगितले. सह्याद्रीबाहेर हे घडत असताना मुख्यमंत्र्यांचे अधिकारी किंवा भारतीय जनता पक्षाचा कुणीही नेता तिथे फिरकलाही नाही.

आत्मदहनासाठी पेट्रोलचे कॅन घेऊन 40 विद्यार्थी ‘वर्षा’वर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेरही आज विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. आरोग्य विभाग पदभरतीचा निकाल जाहीर होऊन आठ महिने उलटले तरी या विद्यार्थ्यांचे नियुक्ती आदेश काढण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी ‘वर्षा’वर धडक दिली. या विद्यार्थ्यांना अटकाव करत पोलिसांनी पेट्रोलचे कॅन हिसकावून घेतले व सर्व विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले.

SSPE हा आजार काय आहे?
– एसएसपीई म्हणजे सबॅक्युट स्क्लेरोसिंग पॅनेसेफलायटीस. याला ‘डॉसन रोग’ असेही म्हणतात. हा मेंदूज्वराचा प्रकार आहे. गोवरचे विषाणू जास्त काळ शरीरात राहिल्याने लहान मुलांना एसएसपीई होतो.

– हा आजार दुर्मीळ असून गोवर झालेल्या 10 हजार जणांपैकी दोन जणांना होतो. नवजात बालकांना 15 महिन्यांच्या आत गोवरची लस द्यायची असते. ती दिली नाही तर 600 मुलांमधील एकाला हा आजार होऊ शकतो.

– गोवरचे विषाणू शरीरात जातात, तेव्हा मुलांच्या मेंदूला सूज येते. ताप येतो. या आजारात झटके येतात तसेच उलटय़ा होतात. मुले बेशुद्ध होतात. मृत्यूचा धोका जास्त असतो.

– या आजारात मुलांवर अतिदक्षता विभागातच उपचार करावे लागतात. कारण पाठीच्या कण्यातून ‘इंटरफेरॉन’सारखी औषधे द्यावी लागतात. यामध्ये विषाणू नष्ट करणारी औषधे नसल्याने रुग्ण वाचण्याची शक्यता अगदी कमी असते.