भाजपचा जीवाचा गोवा अन् मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी चाखला भ्रष्टाचाराचा मेवा; स्वपक्षीयांचा आरोप, विरोधकांचाही मोठा दावा

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता असतानाच शेजारील राज्य गोव्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर सत्ताधारी पक्षातील नेते, आमदारांनी अनेक आरोप केले असून दिल्लीतील हायकमांडकडे तक्रार करत नाराजीही व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे विरोधकांनीही केंद्रातील आणि राज्यातील तपास यंत्रणेकडे सावंत यांच्याविरोधात तक्रार करत तपासाची मागणी केली आहे.

गोव्यामध्ये भाजपच्या सदस्यत्व मोहिमेला अल्प प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सावंत यांची लोकप्रियता कमी होत असल्याचेच हे द्योतक असून भविष्यामध्ये कमी मतदान होऊन भाजपला याचा फटका बसण्याची शक्यता आहे, असे दिल्लीमध्ये तळ ठोकून बसलेल्या एका आमदाराने सांगितले. तर गोवा फॉरवर्ड पार्टीचे आमदार विजय सरदेसाई आणि आम आदमी पार्टीचे आमदार अमित पालेकर यांनीही मुख्यमंत्र्यांची धोरणे आणि योजनांबाबत गंभीर चिंता व्यक्त करत तपास यंत्रणांना पत्र लिहिली आहेत.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावरील एक आरोप सध्या दिल्लीत सुरू असलेल्या कथित मद्य घोटाळ्यासारखाच आहे. या कथित घोटाळ्यात अरविंद केजरीवाल यांच्यासह आपच्या अनेक नेत्यांना तुरुंगवास झाला. तर विजय सरदेसाई यांनी भाजप सरकारने व्हीआयपींवर केलेल्या खर्चाचा लेखाजोखाच मांडला आहे. गोवा सरकारने 2022 पासून व्हीआयपींच्या वाहतुकीवर तब्बल 4.32 कोटी रुपये, तर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्कामासाठी 1.33 कोटी रुपये खर्च केले आहेत, तसेच 40 लाख रुपये फक्त मिठाईवर खर्च केल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला.

प्रमोद सावंत यांच्या कारकि‍र्दीमध्ये गोव्यात जमीन हडपण्याचे प्रकार वाढले असून सरकार याला तोंड देताना अपयशी ठरल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला. याप्रकरणी एसआयटी आणि निवृत्त न्यायमूर्ती व्ही.के. यांच्या नेतृत्वाखाली आयोगाची स्थापना करूनही या प्रकरणांचा तपास मंदावला आहे. 93 पैकी फक्त 22 प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आल्याचा दावा सरदेसाई यांनी केला.

सरदेसाई यांनी सावंत यांचे सहकारी मंत्री अटानासिओ मोन्सेरेट यांच्यावर टीका केली असून त्यांच्यावर 50 हजार कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप केला आहे. तसेच राज्यात बेकायदा बांधकामे आणि भूखंडांची विक्रीही बिनबोभाट सुरू असल्याचे भाजप आमदारांनी हायकमांडच्या निदर्शनास आणून दिले आहे. 1971 मध्ये गोव्यात 25 पैसे प्रति चौरस मीटर एवढा दर होता, तो आता 1 लाख 19 हजार प्रति चौरस फुटावर पोहचला असून यातही घोटाळ्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, काँग्रेस खासदार कॅप्टन व्हिरिएटो फर्नांडिस यांनी गोव्यातील ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. त्यांनी सावंत यांच्या मतदारसंघातील एका महिलेवर पोलीस खात्यात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून लाच घेतल्याचा आरोप केला आहे. तर सरदेसाई यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील एडीसी भरतीतील घोटाळा उघड केला आहे. यासह गोव्यातील खाण प्रभावित भागात सार्वजनिक कल्याण आणि विकासासाठी असलेला डीएमएफचा निधी सावंत यांच्याशी संबंधित साई नर्सिंग होमकडे वळवण्यात आल्याचेही नुकत्याच आलेल्या अहवालांमधून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गोव्यामध्ये भाजपच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. ‘Daily Pioneer‘ या वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे.