कॅब वेळेत न आल्यास उबेर कंपनी जबाबदार, न्यायालयाने ठोठावला 54 हजारांचा दंड

दिल्लीच्या राज्य ग्राहक निवारण कक्षाने एका प्रकरणात महत्वाचा निकाल दिला आहे. बुकिंग केल्यानंतरही उबेर कॅब वेळेत न येणे आणि पर्यायी व्यवस्था न करणे हा सेवा दोष मानला आहे. आयोगाने उबेर इंडियाचा युक्तिवाद फेटाळत चालकाच्या बेजबाबदारपणाला जबाबदार मानले आहे. कॅब सेवा पुरवठादार कंपनीवर जिल्हा आयोगाने मानसिक नुकसान आणि खटल्याचा खर्च म्हणून 24 हजार 100 रुपये आणि 30 हजार रुपये दंड भरण्याचा आदेश आयोगाने कायम ठेवला आहे.

राज्य आयोगासमोर सुनावणी दरम्यान उबेर इंडियाने युक्तिवाद केला की, उबेरच्या सेवेत कोणतीही चूक झालेली नाही. उबेर कॅब-सर्व्हिस एग्रीगेटर आणि फॅसिलिटेटर म्हणून काम करते आणि त्यामुळे कॅब ड्रायव्हरच्या चुकांसाठी त्याला जबाबदार धरले जाऊ शकत नाही. उबेर ॲपवर दुसऱ्या बुकिंग पर्यायाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, तक्रारदाराने स्थानिक टॅक्सी शोधली ज्यामुळे विमानतळावर पोहोचण्यास उशीर झाला आणि फ्लाइट चुकली. आयोगाने आपला निर्णय देताना कंपनीचा दावा फेटाळत सांगितले की, कंपनी परिवहन सेवा सुलभ करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देत असली तरी, ग्राहकांना समाधानकारक आणि वेळेवर सेवा पुरविल्या जातील याची खात्री करणे ही कंपनीची जबाबदारी आहे. कंपनीने तक्रारदाराला वेळेवर आणि व्यवहार्य पर्याय उपलब्ध करून द्यायला हवा होता. तक्रारदाराच्या तक्रारीचे वेळेवर निराकरण न करणे हे स्पष्टपणे ग्राहकांना योग्य सेवा न देणे दर्शवते ही कंपनीच्या सेवेतील त्रुटी असल्याचे सांगत आयोगाने उबेर इंडियाचे अपील फेटाळले.

तक्रारदाराने इंदूरला जाण्यासाठी फ्लाइट पकडण्यासाठी दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर उबेर ॲपद्वारे कॅब बुक केली होती. मात्र चालक कॅब घेऊन आला नाही. वारंवार फोन करूनही कंपनीकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तक्रारदाराने कॅब रद्द केली. दुसरी टॅक्सी विमानतळावर पोहोचेपर्यंत फ्लाइट चुकली आणि तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीला दुप्पट भाड्याने विमानाने इंदूरला जावे लागले. उबर इंडियाने तक्रारदाराच्या कायदेशीर नोटीसलाही उत्तर दिले नाही.