भाजपाच्या खोट्या प्रचाराची काँग्रेस आज करणार पोलखोल

महाविकास आघाडीने लोकसेवेच्या पंचसुत्रीची घोषणा केली. त्याच्या दुसऱयाच दिवशी भाजपने वृत्तपत्रात मोठय़ा जाहिराती देऊन काँग्रेसशासित कर्नाटक, तेलंगाणा आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत दिलेल्या गॅरंटी पूर्ण केल्या नाहीत असा खोटा प्रचार करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपच्या या खोटय़ा प्रचाराची काँग्रेसचे दोन मुख्यमंत्री व एक मुख्यमंत्री उद्या शनिवारी मुंबईत पोलखोल करणार आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे हे फेक नॅरेटिव्ह हाणून पाडण्यासाठी व महाराष्ट्राच्या जनतेसमोर सत्य मांडण्यासाठी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खु, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी व कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार व कॉँग्रेसच्या पब्लिसिटी विभागाचे प्रमुख पवन खेरा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत.

काँग्रेस पक्षाने कर्नाटक, तेलंगाणा व हिमाचल प्रदेश निवडणुकीत दिलेल्या गॅरंटीची अंमलबजावणी सुरू आहे. या तिन्ही राज्यातील कोटय़वधी लोकांना या गॅरंटीचा लाभ मिळत आहे. काँग्रेस शासित राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री भाजपाचा खोटाडरडेपणा उघडा पाडून राज्याच्या जनतेसमोर सत्य मांडणार आहेत.