‘हिंदूंना तुमच्यापासून धोका आहे, राजीनामा द्या’, पवन खेरा यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना सुनावले

राजस्थानमध्ये रविवारी एका कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक लक्षवेधी वक्तव्य केले. हिंदुस्थान हा हिंदु राष्ट्र आहे असे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. तसेच जाती आणि भाषेचे भेद सोडून सर्व हिंदुंनी एकत्र आले पाहिजे असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेरा यांनी भाजप आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

पवन खेरा यांनीही मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर भाष्य केले. भागवत यांनी आधी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि दलित किंवा आदिवासी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख बनवावे आणि मगच जातीय समानतेबद्दल बोलावे, असे ते म्हणाले. हिंदूंना धोका असेल तर त्यांना तुमच्यापासून धोका आहे. असे ते यावेळी म्हणाले. यासोबतच पवन खेरा यांनी एनआरसी आणि ईडीवरही निशाणा साधला.

हरियाणातील एक्झिट पोलवरून भाजपवर टीकास्त्र

पवन खेरा यांनी हरियाणाच्या एक्झिट पोलवरून भाजपवर टीकास्त्र सोडले. एक्झिट पोलमध्ये टीव्ही चॅनेल मोदींऐवजी नड्डा आणि सैनी यांची छायाचित्रे दाखवत आहेत. यावरून भाजपची स्थिती किती बिकट आहे हे दिसून येते. एवढेच नाही तर जम्मू-काश्मीरमध्येही यांचा पराभव होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर विधानसभेत पाच सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना वाट्टेल ते कारस्थान करू द्या, आम्ही तिथे सरकार बनवणार आहोत हे निश्चित. असा निर्धार यावेळी पवन खेरा यांनी केला.