काँग्रेसचा पोलीस ठाण्यात ठिय्या, बेताल आमदार संजय गायकवाडांवर गुन्हा

आरक्षणाच्या संदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांची जीभ छाटणाऱ्यास 11 लाख रुपये इनाम देण्याची बिनडोक घोषणा करणारे मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी काँग्रेसने पोलीस ठाण्यात तब्बल पाच तास ठिय्या दिला. काँग्रेसचे रौद्र रूप पाहून अखेर पोलिसांनी आमदार गायकवाडांवर गुन्हा दाखल केला.

अमेरिका दौऱ्यावर असलेले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमात आरक्षणासंदर्भात विधान केले. त्यावरून राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्यास 11 लाख रुपये इनाम देण्याची घोषणा मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केली. आमदार गायकवाड यांच्या बेताल विधानामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून ठिकठिकाणी त्यांचा निषेध करण्यात येत आहे.

पुन्हा दिली गाडून टाकण्याची धमकी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 19 सप्टेंबर रोजी बुलढाण्यात कार्यक्रम आहे. दुसरा कार्यक्रम लाडकी बहीणीचा आहे. गोरगरीब शेतकरी महिलाचा आहे. माझ्या कार्यक्रमात काँग्रेसच्या कोणी कुत्र्यानी घुसण्याचा प्रयत्न केला तर तिथेच गाडून टाकू अशी धमकी पुन्हा आज काँगेसच्या पोलीस ठाण्याच्या आंदोलनानंतर आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे.