मिंधेंच्या अपात्रतेचा निर्णय 10 ऑगस्टपूर्वी घ्यावाच लागेल – नाना पटोले

राज्यात डाकूगिरी करून लूट करणारे सरकार अस्तित्वात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याच्या सहकाऱ्यांचा अपात्रतेचा निर्णय 10 ऑगस्टपूर्वी हा घ्यावाच लागेल जर निर्णय दिला नाही तर सर्वोच्च न्यायालय त्याबाबत निर्णय देऊ शकतो त्यामुळे ते निश्चितच अपात्र होतील, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

ठाण्यात आज काँग्रेसच्या वतीने विविध विभाग व सेलची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. त्यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. राज्यात लोकशाहीला न मानणारे सरकार आहे त्यामुळे काहीही होऊ शकते. आधी राज्यात ईडी सरकार होते आता तीन तिघाडा सरकार असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे निरव मोदी,ललित मोदी यांच्या विरोधात काय चुकीचे बोलले आहेत ते सांगावे. ते डाकू चोर नसतील तर त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे, अदानी आणि मोदी यांचे नाते काय? निरव मोदी आणि नरेंद्र मोदी यांचे नाते काय ? याचे उत्तर केंद्राने द्यावे, असा सवाल नाना पटोले यांनी केला. राहुल गांधी यांच्या विरोधात जो न्यायालयाने निर्णय दिला आहे त्याचा जाब लोकशाही मार्गाने आंदोलनाच्या माध्यमातून विचारला जाईल असेही त्यांनी स्पष्ट करत न्याय व्यवस्थेवर सरकारचा दबाव असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

काँग्रेसचे कुणीही भाजपमध्ये जाणार नाही

राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा निघाल्यानंतर महाराष्ट्रातल्या भाजपच्या पायाखालची वाळू सरकारला लागली. ही पदयात्रा महाराष्ट्रात आली तेव्हा काँग्रेसचे नेते भाजप मध्ये जाणार अशी बोंब भाजपच्या नेत्यांनी उठवली होती. अजित पवारांना नंतर काँग्रेस फुटणार असा दावा केला जात आहे. मात्र महाराष्ट्रातील काँग्रेसचा एकही आमदार भाजप सोबत जाणार नाही असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.

विरोधी पक्षनेता काँग्रेसचाच

लोकसभा किंवा विधिमंडळामधील कामकाजामध्ये ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याच पक्षाचा विरोधी पक्ष नेता असतो. आजचे चित्र आपण बघितले तर आज काँग्रेसचा विरोधी पक्षातल्या सगळ्यात मोठा पक्ष आहे. त्यामुळे दावा करण्याची गरज नाही ही प्रोसेस असून विधिमंडळातल्या अध्यक्षांना पत्र देण्यात येईल असेही पटोले म्हणाले