ईडी, सीबीआय, आयटीचा राजकीय हत्यार म्हणून वापर

आज केंद्र सरकार ईडी, सीबीआय आणि आयटीचा राजकीय हत्यार म्हणून वापर करत आहे. निवडणूक आयुक्तांची नियुक्ती पंतप्रधान स्वतः करतात. निवडणुकीच्या दोन महिने आधी काँग्रेसची बँक खाती गोठवली जातात. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली जाते. विरोधी पक्षाच्या नेत्यांना धमक्या दिल्या जातात, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी आज तामीळनाडूतील तिरुनेलवेली येथील प्रचार सभेत मोदी सरकारच्या दडपशाही आणि हुकूमशाहीविरोधात कडाडले. देशात विचारधारेचे युद्ध सुरू असून एका बाजूला न्याय, स्वातंत्र्य आणि समता आहे, तर दुसऱया बाजूला आरएसएस, मोदी आणि त्यांचे सरकार आहे, असे ते म्हणाले.

1 लाखांहून अधिक शेतकऱयांच्या आत्महत्या

देशात रोज 30 शेतकरी आत्महत्या करत असून भाजपच्या कार्यकाळात तब्बल 1 लाखांहून अधिक शेतकऱयांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱयांचे उत्पन्नही दुपटीने वाढले नाही आणि त्यांच्या शेतमालाला किमान हमीभावही मिळाला नाही, अशा शब्दांत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर एक्सवरून घणाघात केला. तसेच काँग्रेस सत्तेत आल्यास शेतमालाला हमीभाव देण्यासह शेतकऱयांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.