प्रकाश आंबेडकरांना खरोखरच महाविकास आघाडीत यायचे होते का?

लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी देशात ‘इंडिया’ आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडी तयार करून लोकशाहीवादी पक्ष सामंजस्याने एकत्र आले आहेत. भाजपविरोधी सर्व पक्षांची हीच भूमिका आहे. मात्र, वंचितने भाजपला फायदेशीर आणि अनुकूल होईल, अशीच भूमिका घेतली. वंचितच्या भूमिकेमुळे दलित समाजात असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे वंचितला खरोखरच महाविकास आघाडीत यायचे होते का, असा करडा सवाल ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि काँग्रेस नेते भालचंद्र मुणगेकर यांनी प्रकाश आंबेडकर यांना विचारला आहे.

डॉ. मुणगेकर यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही जोरदार टीका केली. ते म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक गोळवलकर यांनी राज्यघटनेचा उल्लेख गोधडी असा केलेला आहे. एक पक्ष, एक पंथ, एक धर्म अशी हिटलरला अभिप्रेत असलेली भूमिका प्रत्यक्षात भाजप आणू पाहत आहे. हिंदुस्थानने धर्मनिरपेक्षामुळे आपले अस्तित्व टिकून ठेवलेले आहे. फक्त मी म्हणजे देश अशी पंतप्रधान मोदी यांची भूमिका आहे, असे मुणगेकर म्हणाले.

स्वतंत्र लढून ते भाजपचा पराभव कसा करणार?

वंचितला 2014 च्या लोकसभेत 6.6 टक्के मते मिळाली होती तर विधानसभेत 4.6 टक्के फक्त मते मिळाली. संभाजीनगरची एकच जागा लोकसभेत निवडून आली. वंचितच्या भूमिकेमुळे मागीलवेळी महाविकास आघाडीचे जवळपास 9 उमेदवार लोकसभेत पडले. मताधिक्य वंचितएवढे त्यांना मिळाले होते. असे असताना आता स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरून प्रकाश आंबेडकर भाजपचा पराभव करणार आहेत का, असा सवालही मुणगेकर यांनी विचारला.