राज्यात सध्या गाजत असणाऱ्या नगरमधील अल्पवयीन मुलांच्या धिंड प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. सुपारी घेतल्याच्या रागातून धिंड काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काहींच्या हत्येसाठी तीस लाख रुपयांची सुपारी दिल्याचा आरोप अर्ध नग्न प्रकरणातील आरोपींनी केला होता. याबाबत काळे यांनी पत्रकार परिषद घेत धक्कादायक खुलासे आणि गंभीर आरोप केले आहेत. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, माजी नगरसेवक संजय झिंजे, उपाध्यक्ष अलतमश जरीवाला आदी उपस्थित होते.
मी कुणाची सुपारी दिली नाही. विधानसभेच्या निवडणुकीत मी उमेदवार म्हणून रिंगणातच दिसू नये म्हणून मला कायमचा बाद करण्यासाठी माझ्याच हत्येचा कट शिजवला जात असल्याचा संशय काळे यांनी व्यक्त केला आहे. शिवसैनिकांच्या केडगाव हत्याकांडाची पुनरावृत्ती करत माझी हत्या काही लोकांना करायची आहे, असे यातून दिसते. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना लेखी निवेदन पाठवून या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी किरण काळे यांनी केली आहे.
शहरात काही लोक स्वतःला कार्यसम्राट समजतात. राजकारणात विरोधकाला राजकीय पद्धतीने जरूर विरोध करावा. मात्र त्याचा अशा प्रकारे कायमचा काटा काढण्यासाठी षडयंत्र रचू नयेत. शहरातील राजकारणाची पातळी अत्यंत खालच्या स्तराला गेली आहे. मात्र अशा प्रकारांना घाबरून शहर भयमुक्त करणे आणि विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याचे माझे काम यत्किंचितही थांबणार नाही. नगरकरांच्या भल्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहील, असा ठाम निर्धारही किरण काळे यांनी पत्रकार परिषेदत व्यक्त केला.