हरयाणातील 20 जागांवर फेरमतमोजणी करा, काँग्रेसची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी

हरियाणा विधानसभा निवडणुकीत इव्हीएम हॅक झाल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. मतदान यंत्रात गडबड झाल्याने भाजपला काही मतदारसंघात अनपेक्षित यश मिळाले. मतमोजणी दरम्यान इव्हीएमध्ये त्रुटी आढळून आलेल्या 20 मतदारसंघात फेर मतमोजणी घेण्याची मागणी कॉँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

काँग्रेसने आज एका निवेदनाद्वारे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे हरियाणात 20 मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेत गडबड झाल्याचा आरोप केला आहे. नारनौल, करनाल, डबवाली, रेवाडी, होडल, कालका, पानिपत सिटी, इंद्री, बडखल, फरिदाबाद एनआयटी, नलवा, रनिया, पटोदी, पलवल, बल्लभगड, बरवाला, उंचा कलां, घरौंदा, कोसली आणि बादशाहपूर विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

फेरमोजणी व्यतिरिक्त, काँग्रेसने या 20 मतदारसंघातील व्हीव्हीपॅट स्लिप जुळवण्याची मागणी देखील केली आहे. ज्या ईव्हीएम मशिन्समध्ये 90 टक्क्यांहून अधिक बॅटरी होती त्यावरही काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. या मशीनमध्ये छेडछाड झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.