मालमत्ताधारकांना वाढीव दराने मालमत्ता कराची बिले ऑनलाइन अपलोड केल्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी करनिर्धारण विभागाने कायदेविषयक मत घेतले असून त्यानुसार यावेळच्या देयकांमध्ये देय असलेली रक्कम आणि शुल्क आकारण्यायोग्य रक्कम अशा दोन रक्कम देण्यात आल्या असून ग्राहकांना प्रत्यक्ष बिले पाठवताना देय रकमेची बिले पाठवणार असल्याचे पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी स्पष्ट केले आहे.
न्यायालयाच्या निर्देशामुळे ऑनलाइन बिलांमध्ये वेगवेगळी रक्कम दाखवण्यात आली असल्याचे आयुक्तांचे म्हणणे आहे. त्यामुळे ग्राहकांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी आम्ही देय रकमेचे नवीन देयके पाठवू. ही रक्कम मालमत्ताधारकांच्या 2022-23 या गेल्या वर्षीच्या मालमत्ता कराइतकी असेल, चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कर वाढणार नाही असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, काँग्रेसचे माजी नगरसेवक आसिफ झकेरिया यांनी आयुक्तांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून ‘मला वैयक्तिक आलेल्या मालमत्ता कर आकारणीत गेल्या वर्षीपेक्षा यंदा 15 ते 20 टक्के वाढीव दराने देयक आल्याचे त्यांनी सांगितले.