चारा, पाण्याअभावी माणमध्ये दुग्धोत्पादन घटले; कडब्याचे दर कडाडल्याने शेतकऱयावर पशुधन विकण्याची वेळ

दूध उत्पादनात जिह्यात अग्रेसर होऊ पाहत असलेल्या माण तालुक्याची अवस्था दुष्काळामुळे बिकट झाली आहे. सध्या तलाव कोरडे पडले असून, विहिरींनी तळ गाठला आहे. परिणामी,  परिसरात पाणी आणि चाऱयाअभावी दुधाचे उत्पादन घटले आहे. त्यातच दुधाचे दर घसरल्यामुळे आणि कडब्याचे दर वाढल्यामुळे पशुधन सांभाळणे शेतकऱयांना शक्य होत नाही. त्यामुळे शेतकरी जनावरे विकू लागले आहेत.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून माणमधील शेतकऱयांचा पाण्याचा संघर्ष कायम असून, दुष्काळ पाचवीलाच पूजलेला आहे. भौगोलिक विषमतेबरोबरच पर्जन्यमानही विस्कळीत स्वरूपाचे असल्याने एकूणच चाऱयाअभावी जनावरे बाजारात विक्रीसाठी आणली जात आहेत. महागडा चारा घेऊन जनावरे जगवण्याची जिद्द बाळगणाऱया पशुपालकांना दुधाचे दर घसरल्याने तोटाच होत आहे.

सद्यस्थितीत इथले पशुधन वाचवण्यासाठी उपलब्ध चारा मिळत नसल्याने व मिळालेला चारा चढय़ा भावाने विकत घेण्याची वेळ बळीराजावर येऊन ठेपली आहे. ऊस 3 ते 3500 हजार रुपये गुंठा, कडवळ, मकवान 2000 रुपये गुंठा, तर ज्वारीची पेंडी 1500 ते 2500 रुपये शेकडा भावाने विकत घ्यावी लागत आहे. खपरी पेंड 2600ते 2700प्रती पोते, सरकी 1200ते 1300 अशा दराने विकत घ्यावी लागत आहे.

जानेवारीपर्यंत विहिरीत जेमतेम पाणी होते, या पाण्यावर बागायतदारांनी पिके घेण्याचे धाडस केले. पण जानेवारीनंतरच विहिरींनी तळ गाठला. सध्या जनावरे ज्वारीच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या वैरणीवर अवलंबून आहेत. अपवादात्मक ठिकाणीच हिरवा चारा उपलब्ध आहे. त्

माण तालुक्यात शेतीसाठी तर नाहीच; पण पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर आहे. सध्या तालुका प्रशासनातर्फे माणच्या 105 गावांपैकी 53 गावे 300 वाडय़ा-वस्त्यांवर 56 हून अधिक टँकरने पाणीपुरवठा करून नागरिकांची तहान भागविली जात आहे.

माणमधील सध्याचे पशुधन

गाई व म्हैस ः 84015,

शेळ्या व मेंढय़ा ः  147960,

कोंबडय़ा ः 245184

दररोज एका लहान जनावराला 20 लिटर, तर मोठय़ा जनावरांसाठी 40 लिटर पाणी लागते.