मिंधेंनी दावोस दौऱ्यात 1.58 कोटींचे बिल थकवले, स्वित्झर्लंडमधील कंपनीची एमआयडीसीला नोटीस

मिंधे सरकारचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील जानेवारी महिन्यातील दावोस दौरा सुरुवातीपासूनच वादात सापडला आहे. या दौऱ्यावर झालेला खर्च आणि दावोसमधून आणलेली गुंतवणूक याबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच आता मिंधे सरकारने दावोस दौऱ्यातील आदरातिथ्य सेवेचे 1.58 कोटींचे बिल थकवल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. वारंवार मागणी करूनही थकीत बिलाची रक्कम दिली जात नसल्याने स्वित्झर्लंडमधील कंपनीने एमआयडीसीला कायदेशीर नोटीस बजावली आहे.

दावोस येथे 15 ते 19 जानेवारी दरम्यान जागतिक आर्थिक परिषद झाली. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सहभागी झालेले मंत्री आणि अधिकारी आदी सदस्यांच्या आदरातिथ्य सेवेचे 1.58 कोटी रुपये एमआयडीसीने दिले नसल्याचा आरोप 28 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुख्यमंत्री कार्यालय, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि वर्ल्ड इकॉनॉमिक पह्रमला पाठविलेल्या नोटीसमध्ये स्वित्झर्लंडमधील सेवा पुरवठादार कंपनीने केला आहे. एमआयडीसीने एपूण बिलाच्या 3.75 कोटी रुपयांहून अधिक रक्कम भरली असून उर्वरित 1.58 कोटी रकमेसाठी सदर कंपनीने ही कायदेशीर नोटीस बजावली आहे.

मिंध्यानी जागतिक लाज आणली – आदित्य ठाकरे

मिंधे सरकारच्या दावोस दौऱ्याबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. मी दोन वेळा त्यांच्या दावोस जंकेटसचा पर्दाफाश केला. यांचा दौरा महाराष्ट्रासाठी नाही तर स्वतःच्या मौजमजेसाठी होता. मिंधे सरकारने जागतिक लाज आणली, अशी टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

दावोसमध्ये खाऊन उदारी ठेवून आले – रोहित पवार

दावोसमध्ये जाऊन महाराष्ट्र सरकार खाऊन पिऊन आले, बिल उदार ठेवून आले. आता उधारी देत नाही म्हणून तिथल्या कंपनीने सरकारला नोटीस पाठवली. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मंचावर महाराष्ट्र सरकारची बदनामी होऊ शकते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.