पोटातून काढले 9.7 कोटींचे कोकेन 

प्रवाशाने पोटात लपवून आणलेले 9.7 कोटींचे कोकेन महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) ने जप्त केले आहे. जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्या प्रवाशाच्या पोटातून त्या कोकेनच्या 124 पॅप्सूल बाहेर काढल्या आहेत. ड्रग तस्करी प्रकरणी त्या प्रवाशाला डीआरआयने अटक केली.

विमानतळावर ड्रग तस्करीचे प्रकार होऊ नयेत म्हणून सीमा शुल्क विभागाने खबरदारी घेतली आहे. 18 सप्टेंबरला ब्राझील देशाचा नागरिक असलेला प्रवासी साऊ पाउलोहून येथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला डीआरआयच्या अधिकाऱ्याने चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेची तपासणी केली. त्या बॅगेत काहीच आढळून आले नाही. कसून चौकशी केल्यावर त्याने पोटातून कोकेन आणल्याची कबुली डीआरआयच्या अधिकाऱ्यांना दिली. त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाच्या आदेशानंतर त्याला जे. जे. रुग्णालयात दाखल केले. जे. जे. तील डॉक्टरांनी त्याच्या पोटातून 124 कोकेनच्या पॅप्सूल बाहेर काढल्या. जप्त केलेल्या कोकेनची किंमत सुमारे 9.7 कोटी रुपये इतकी आहे. कोकेन तस्करीच्या मोबदल्यात त्याला काही रक्कम मिळणार होती. त्या प्रवाशाला ते कोकेन कोणी दिले याचा तपास डीआरआय करत आहे.