भ्रष्ट मिंधे सरकारकडून कोस्टल रोडला जाणीवपूर्वक विलंब; सरकार आल्यानंतर सखोल चौकशी करणार, आदित्य ठाकरे यांचा इशारा

भ्रष्ट मिंधे सरकारने खर्च वाढवण्यासाठी कोस्टल रोडला जाणीवपूर्वक विलंब केल्याने तो अद्याप पूर्ण झालेला नाही, असा आरोप शिवसेना नेते-आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केला. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या विलंबाची तपशीलवार चौकशी करू, असा इशाराही त्यांनी दिला.

कोस्टल रोडला गळती लागल्याने मिंधे सरकारवर टीका होऊ लागली आहे. आदित्य ठाकरे यांनीही आज ट्विट करून कोस्टल रोडच्या मुद्दय़ावरून मिंधे सरकारवर शरसंधान केले. महाविकास आघाडीचे सरकार कायम राहिले असते तर मुंबई कोस्टल रोड डिसेंबर 2023 पर्यंत पूर्णपणे तयार झाला असता आणि नागरिकांसाठी खुला झाला असता, पण भ्रष्ट राजवटीने आमचे सरकार पाडल्यानंतर त्या कामाचा वेग मुद्दाम कमी केला आणि खर्च वाढवण्याचे काम केले, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. फेब्रुवारीमध्ये अनेक वेळा कोस्टल रोडच्या उद्घाटनाच्या तारखा बदलत राहिल्या, त्यावेळेस आपण ते निदर्शनासही आणले होते आणि तेही फक्त एका लेनसाठी सुरू होते. शेवटी आम्ही केलेल्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी निवडणुकीपूर्वी घाईघाईत 1 लेन उघडण्यात आली. ती सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंतच खुली असते! असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

संपूर्ण मार्ग कधी खुला होणार?

संपूर्ण कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेसाठी कधी खुला होणार अशी विचारणा झाल्यानंतर सरकारने आधी मार्च, नंतर एप्रिल, नंतर मेपर्यंत संपूर्ण रस्ता खुला केला जाईल, असे सांगितले. आता जवळपास जून आलाय, असे नमूद करतानाच नागरिकांना कोस्टल रोड उघडण्याच्या अंतिम तारखेबद्दल महानगरपालिका अधिकृत अपडेट देईल का, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.