कोस्टल रोडच्या बोगद्यातील गळती रोखण्याचे काम सुरू, मात्र वाहतूक सुरळीत

मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडच्या वरळी ते मरीन ड्राइव्ह मार्गिकेच्या बोगद्यातील गळती रोखण्याचे काम मुंबई महापालिकेकडून सुरू असून ते आणखी दोन आठवडे सुरू राहणार आहे. सुमारे 150 ते 200 मीटर लांबीच्या लेनवर हे काम सुरू आहे. मात्र हे काम सुरू असताना वाहतुकीला कोणताही अडथळा येत नसल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.

मुंबईच्या सौंदर्यात भर घालणारा, मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वाचा ठरलेल्या कोस्टल रोडची वरळी ते मरीन ड्राइव्ह ही मार्गिका मार्च महिन्यात सुरू करण्यात आली. त्यानंतर काही दिवसांनी या मार्गिकेच्या बोगद्यात पाणी गळती होत असल्याचे आढळले. त्यानंतर जून महिन्यातही पाणी गळती सुरू असल्याचे आढळले. त्यामुळे आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बोगद्यांमधील सांध्यांमधून होणारी गळती रोखण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम जून महिनाअखेरपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती एका अधिकाऱयाने दिली.