National Film Award- कोरिओग्राफर जानी मास्टरने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गमावला; महिलेचा बलात्काराचा आरोप

सध्या राष्ट्रीय चित्रपट सोहळ्याची लगबग सुरू आहे. 8 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी अनेक कलाकारांची नावे सध्या चर्चेत आहे. मात्र पुरस्कार सोहळा अवघ्या दोन दिवसांवर असताना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कोरिओग्राफर जानी मास्तर यांना दिलेला राष्ट्रीय पुरस्कार निलंबित केला आहे. या कोरिओग्राफरवर बलात्काराचा आरोप असून ते बराच काळ तुरूंगात होते. मात्र या आठवड्यात त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता.

जानी मास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरिओग्राफरचे नाव शेख जानी बाशा आहे. ‘तिरुचित्रंबलम’ चित्रपटातील ‘मेघम करुक्कथा’ या गाण्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मात्र शुक्रवारी I&B मंत्रालयाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सेलने जानी मास्टरचा पुरस्कार निलंबित करण्याबाबत माहिती देणारे निवेदन जारी केले. नृत्यदिग्दर्शक जानी मास्टर यांच्यावरील ‘आरोपाचे गांभीर्य लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सेलने जानी मास्टर यांना दिलेले निमंत्रणही मागे घेतले आहे. त्यामुळे जामीन मिळूनही जानी मास्टर या सोहळ्यासाठी उपस्थित राहू शकत नाहीत.

बलात्काराचा आरोप कोणी केला?
जानी मास्टर यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप आहे. त्याची सहाय्यक कोरिओग्राफर असलेल्या एका महिलेने हा आरोप केला होता. जानी मास्टरने 2020 मध्ये मुंबईत कामानिमित्त बाहेर प्रवास करत असताना या महिलेचा लैंगिक छळ केला आणि त्याबद्दल कोणालाही न सांगण्याची धमकीही दिली होती. मात्र या महिलेने त्यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवल्यानंतर सायबराबाद पोलिसांनी 19 सप्टेंबर रोजी जानी मास्तरला गोव्यातून अटक केली. यानंतर जानीला हैदराबाद न्यायालयात हजर केले असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.