तैवानला चीनने चहुबाजूने घेरले; 62 विमाने, 27 जहाजे, 19 युद्धनौका उतरवल्या

ड्रगन चीनने तैवानला चहुबाजूने घेरण्याची तयारी केली आहे. यासाठी चीनने लष्करी कवायती सुरू केल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून चीनकडून या कवायती सुरू आहेत. शुक्रवारी पीएलएच्या पूर्व थिएटर कमांडने तैवानला चहुबाजूने लष्करी कवायत सुरू ठेवल्यानंतर चीनने आज शनिवारीही कवायती सुरू ठेवल्या. दक्षिण चीन सागरात चीनच्या या पावलामुळे जगभरात चिंता वाढली आहे. युक्रेन-रशिया आणि हमास-इस्रायल यांच्यातील युद्धानंतर आता नव्या संघर्षाची शक्यता वर्तवली जात आहे. चीन आणि तैवानला विभक्त करणाऱया तैवान सामुद्रधुनीमध्ये दोन दिवसीय लष्करी कवायत गुरुवारी सुरू झाली. यात चीन लष्कर, नौदल, हवाई दल आणि रॉकेट फोर्सलाही सहभागी केले. याशिवाय पहिल्यांदा लष्करी कवायतीत तटरक्षक दलाचाही समावेश केला. हे चीनच्या दक्षिणेत स्थित किनमेन, मात्सु, वुकीऊ व डोंगचीन बेटांवर तैनात आहेत. गुरुवारी सकाळपासून शुक्रवारी सकाळपर्यंत 49 चिनी विमानांनी मध्य सीमारेषा पार केली. चीनच्या 19 युद्धनौका, कोस्ट गार्डची 7 जहाजे दिसली. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने चीनच्या लष्करी कवायत चिथावणीखोर ठरवत त्याचा निषेध केला. तैवानने आपल्या लष्कराला लढाऊ विमाने आणि जहाजांना अलर्ट मोडवर ठेवले आहे.