विधानसभा निवडणुकीत लागलेल्या धक्कादायक निकालानंतर तब्बल तेराव्या दिवशी महायुतीतील भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यासंदर्भात भाजपकडून प्रसारमाध्यमांतील जाहिरातबाजीत महापुरुषांच्या पह्टोतून सामाजिक न्याय क्रांतीचे प्रणेते व आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जाणीवपूर्वक वगळल्याने करवीरनगरीतून संताप व्यक्त केला जात आहे. महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारकस्थळी भाजपच्या या प्रवृत्तीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली.
महाराष्ट्र शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पुरोगामी असून भाजपने कितीही अडचणी आणल्यातरी ही ओळख पुसणार नसल्याचे कोल्हापूरकरांनी ठणकावले. छत्रपती शाहू महाराज यांचा केलेल्या अवमानप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी केली, तर मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणीही फडणवीस यांनी माफी मागितलेली नाही, अशी आठवणही करून देण्यात आली.
राजर्षी शाहूंना डावलून केलेली जाहिरात महाराष्ट्राला न पटणारी – संभाजीराजे
महाराष्ट्राला घडवण्यात शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचे मोठे योगदान आहे. भाजपने दिलेल्या जाहिरातीची कृती महाराष्ट्राला न पटणारी आहे. शाहू महाराजांना बाजूला करणे ही गोष्ट आम्ही खपवून घेणार नाही. भाजपने ही चूक दुरुस्त करावी, अशा शब्दांत स्वराज पक्षाचे संस्थापक, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी भाजपला फटकारले.