दोनच दिवसांत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना निवासस्थान सोडायला लावले

नुकतीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या अतिशी यांचे सामान त्यांच्या शासकीय निवासस्थानातून बाहेर काढण्यात आले आहे. दोनच दिवसांपूर्वी त्या या निवासस्थानी राहण्यास आल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांचे घर सील केले आहे. त्यांच्याकडे अधिकृत पत्र नव्हते असे कारण देण्यात आले आहे, मात्र राज्यपालांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाने या कारवाईला अभूतपूर्व म्हटले आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्र्यांना घर सोडण्यास सांगण्यात आले आहे. भाजपच्या सांगण्यावरून नायब राज्यपालांनी मुख्यमंत्री अतिशी यांचे सामान जबरदस्तीने काढून घेतले आहे. भाजपच्या एका बड्या नेत्याला मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान देण्याची नायब राज्यपालांची तयारी सुरू आहे. 27 वर्षांपासून दिल्लीत वनवासात असलेल्या भाजपला आता मुख्यमंत्र्यांचे निवासस्थानही ताब्यात घ्यायचे आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे.