मुख्यमंत्र्यांनी माफी मागावीच, पण कोणीतरी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा; शिवपुतळा दुर्घटनेवरून पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

prithviraj-chavan

मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा दुर्घटनेवरून काँग्रेस नेते आणि माजी मुख्यंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महायुती सरकारला जाब विचारला आहे. महायुतीच्या सरकारमध्ये महामानवांचा अपमान केला जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी माफी मागितलीच पाहिजे, पण त्याचबरोबर कोणीतीरी जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, असे  पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्यात संताप आहे. यावरून माध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील महायुती सरकारच्या कारभारावरच बोट ठेवले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून त्यांचा अपमान केला. प्रधनामंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करायचं होतं, एक मोठा इव्हेंट यांना करायचा होता. त्यामुळे ज्या पुतळ्याला बनवयाला तीन वर्षे लागणार होती, तो पुतळा फक्त सहा महिन्यांत तयार करण्यात आला. ज्या व्यक्तीला कोणताही अनुभव नाही त्या व्यक्तीला पुतळा बनवण्याचे काम देण्यात आले. त्यासाठी टेंडर निघाले होते का? कोणी टेंडर काढलं? किती पैसे मिळाले? ज्या आपटेंनी हा पुतळा बनवला त्याला 25 ते 26 लाख रुपये देण्यात आले. मात्र, कॉन्ट्रॅक्टमध्ये 38 कोटींचा खर्च दाखवण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी पारदर्शकपणे सर्वांच्या समोर येणे गरजेचे आहे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला याचा फटका बसणार आहे. त्यामुळे काही लोक माफी मागत आहेत, मुक मोर्चा काढत आहेत, आंदोलन करत आहेत. कोणाविरुद्ध आंदोलन करताय शिवाजी महाराजांविरुद्ध का मुख्यमंत्र्यांविरुद्ध? आमची मागणी आहे की, कोणीतरी घटनेची नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही इव्हेंट म्हणून किंवा राजकारण म्हणून वापर करू शकत नाही. जो सन्मान त्यांना देणं गरजेच होतं तो देण्यात आला नाही. महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना याचे दु:ख झाले आहे. या महायुती सरकारमध्ये महामानवांचा अपमान केला जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी माफी मागितलीच पाहिजे, पण त्याचबरोबर कोणीतीरी जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, अशीही मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

गेटवे ऑफ इंडिया आणि प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण पाहिला आहे. ज्या ठिकाणी हवेचा वेग जास्त असतो त्या ठिकाणाचा डिझाईनमध्ये विचार केला जातो. तिथे कोणतेही वादळ किंवा भूकंप तर नव्हता आला. 40 किमीच्या हवेचा वेगाने पुतळा पडला, पुतळा काय कागदाचा होता का? कोणीही हे स्वीकारणार नाही. जोपर्यंत सर्व कागदपत्रे बाहेर येत नाहीत, तोपर्यंत कोणीही विश्वास ठेवणार नाही. कॉन्ट्रॅक्ट दिले होते का? मूर्तीकाराला किती पैसे दिले होते? कॉन्ट्रॅक्ट कितीचे होते? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत. यामध्ये 100 टक्के भ्रष्टाचारा झाला आहे, हा आमचा स्पष्ट आरोप असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

पुण्यातील पोर्शेकारच्या दुर्घटनेमध्ये श्रीमंताच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला, बदलापूरमध्ये निष्पाप मुलींवर अत्याचार झाला. तिथेही संस्थाचालकांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता सिंधुदुर्गमध्ये शिवपुतळा कोसळून जी घटना घडलीये आणि राणे कुटुंबीय ज्या पद्धतीच्या भाषेचा वापर करत आहे. यामुळे राजकारणाची पातळी घसरत चालली आहे. आणि याला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. अशा लोकांना शिक्षा दिली पाहिजे, त्यांना राजकारणातून हाकललं पाहिजे. मात्र त्यांच्या कृपेने सर्व सुरू आहे, असं म्हणत पृथ्वीराज चव्हान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदीवरही निशाणा साधला.