शिवपुतळा दुर्घटनेतील दोषींना तुरुंगात सडवले पाहिजे -मनोज जरांगे-पाटील

मालवण-राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्या प्रकरणात दोषी व्यक्ती कोणत्याही मंत्र्याचा मित्र अथवा सगासोयरा असू दे, त्याला पकडून तुरुंगात सडवले पाहिजे, अशा शब्दांत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील यांनी शिवपुतळा दुर्घटनेप्रकरणी संताप व्यक्त केला. तसेच याप्रकरणी कुणीही राजकारण करू नये. पुतळा कोसळल्याचे इतके दुःख झाले असते तर या पवित्र स्थानी राडा केला नसता, अशा शब्दांत भाजप खासदार नारायण राणे यांना त्यांचे नाव न घेता सणसणीत टोलाही लगावला.

मनोज जरांगे-पाटील हे शनिवारी रात्री उशिरा मालवणमध्ये दाखल झाले होते. रविवारी सकाळी कडेकोट पोलीस बंदोबस्तात त्यांनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळय़ाची पाहणी केली. यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास सावंत, सतीश सावंत यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि शेकडो मराठा समाज बांधव उपस्थित होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अशा तऱहेने कोसळणे ही घटना मनाला वेदना देणारी आहे. याप्रकरणी सखोल चौकशी व्हायला पाहिजे, असेही ते म्हणाले. दरम्यान, मी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. या घटनेची पाहणी करणे, महाराजांचे दर्शन घेणे हे माझे कर्तव्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

मराठा समाज मच्छीमारांच्या बाजूने

वाढवण बंदराच्या कामात जर मच्छीमार समाज विस्थापित होणार असले तर महाराष्ट्रातील मराठा समाज या मच्छीमारांच्या बाजूने उभा राहाणार आहे. वाढवण येथील जनआंदोलन हे मच्छीमारांच्या रोजीरोटीच्या प्रश्नांसाठी आहे. या प्रकल्पाबाबत मी माहिती घेत असून सरकारने रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जरांगे-पाटील यांनी यावेळी केली.