छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिव्हलला उत्स्फूर्त प्रतिसाद

दादर येथे भरलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिव्हलचा दुसरा दिवस भरपूर गर्दीचा ठरला. ‘आयुष्यावर बोलू काही’ या संगीतकार सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांच्या कार्यक्रमात लहानग्यांनी ‘अगोबाई… ढगोबाई…’ गाण्यावर धरलेला ताल, संतोष चौधरी ऊर्फ दादुसने सादर केलेली भन्नाट कोळी गीतांनी आज छत्रपती शिवाजी पार्कचा परिसर दणाणून गेला. यासोबतीलाच तरुणाच्या ‘आर्टगिरी’ची कमाल अनुभवण्याची संधीही या फेस्टिव्हलच्या निमित्ताने मिळत आहे. रविवार, 14 जानेवारीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिव्हलमध्ये आणखी विविध कार्यक्रमांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.

लाईव्ह कार्यक्रमासोबतच खवय्यांसाठी विविध पदार्थांची चव चाखता येणार आहे. कोळी सी फूड, खान्देशी थालीपीठ, वांग्याचे भरीत आणि भाकरी, पुण्याची मस्तानी, महाबळेश्वर येथील बुमबेरी आईस्क्रीम, मालवणी पदार्थ त्याचबरोबर डायट स्टेशनच्या स्टॉलवर झुंबड उडत आहे. शिवसेना नेते, आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिवसेना सचिव, वेधचे अध्यक्ष अॅड. साईनाथ दुर्गे यांनी या फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे.

प्रणव पाटील या तरुणाने पहिल्या लोकलपासून आताची एसी ट्रेन ते मुंबई मेट्रोचे मॉडेल, त्यांच्या इंजिनच्या माहितीसह मांडले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या ताफ्यातील सर्वात मोठे पाल जहाज, गलबत शिवाजी, नारंग, शिबड मालवाहू जहाज यांच्या प्रतिकृती पाहायला मिळतील.
शिव येथील श्री मंडीलकर आर्ट स्कूलच्या किरण कदम या विद्यार्थ्यांनी जिजाऊंच्या जयंतीनिनिमित त्यांचे शिल्प साकारले.
नीता कांबळे या चित्रकाराने 10 मिनिटांत पेन्सिल स्केच तयार करून दिले.
‘बायग्या’ या मालवणी टी शर्टच्या ब्रॅण्डने तर धमाल उडवून दिली. मालवणी झिल, मालवणी चेडू… अशी लाईन असलेला टी शर्ट भारी वाटत आहे.