शिवरायांच्या जयघोषाने फोर्ट परिसर दुमदुमणार! स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ आयोजित आज ‘भव्य शिवराय संचलन’

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करण्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी गुरुवार, 21 मार्चला ‘स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने भव्य ‘शिवराय संचलन’ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळय़ासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. हे शिवराय संचलन भारतीय रिझर्व्ह बँक, अमर बिल्डिंग, पर्ह्ट येथून दुपारी 4 वाजता सुरू होणार आहे.

शिवराय संचलनाचा शुभारंभ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या शिवराय संचलनामध्ये भारतीय कामगार सेना, युवासेना, भारतीय विद्यार्थी सेना आणि स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाशी संलग्न असलेल्या सर्व समित्यांच्या आस्थापनांमधील कर्मचारी-भगिनी, शिवसेनेचे सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत. या शिवराय संचालनासाठी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष अनिल देसाई, महासंघ कार्याध्यक्ष विलास पोतनीस, सुनील शिंदे व सरचिटणीस प्रदीप मयेकर, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत यांच्यासह शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विभागप्रमुख, महिला विभाग संघटक हे कार्यकर्त्यांसह उपस्थित राहणार आहेत. संचलनाच्या मार्गावर भगवे झेंडे, पताका, बॅनर लावून वातावरण भगवेमय करण्यात येणार आहे. यासाठी शिवसेना दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख संतोष शिंदे यांचे सहकार्य लाभले आहे.

फोर्ट ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत संचलन
संचलनाच्या मार्गावरील हुतात्मा स्मारकाला मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण करण्यात येईल तसेच श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (म्युझियम) येथील वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करण्यात येईल. शिवराय संचलनाचा समारोप हिंदुस्थानचे प्रवेशद्वार (गेट वे ऑफ इंडिया) येथील छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात येईल. यानंतर शिवराय संचलनाचा समारोप होईल, अशी माहिती संघटन सचिव उमेश नाईक यांनी दिली आहे.