आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. जमावबंदी आदेश लागू असतानाही करण्यात आलेले आंदोलन सार्वजनिक शांततेचा भंग करणारेच असेल असे नाही, असे परखड निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाने मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासमोर ‘पन्नास खोके एकदम ओके’ अशा घोषणा देत आंदोलन करणाऱया आंदोलकांवरील गुन्हा रद्द केला.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात कापसाला 12 हजार रुपये भाव मिळावा, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱयांना तात्काळ मदत देण्यात यावी, अशी मागणी करत शिवसेना कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या ताफ्यावर कापूस आणि रिकामे खोके फेकले. यावेळी ‘पन्नास खोके, एकदम ओके’ अशा घोषणाही देण्यात आल्या होत्या. या प्रकरणी 13 जणांवर दंगलीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.