स्वतःला डीवायएसपी म्हणून घेणारा निघाला घरफोड्यांचा म्होरक्या; एक अग्निशस्त्र, दोन जिवंत काडतूसं जप्त

राज्यभरात दरोडा टाकण्यासाठी साथीदारांचे जाळे थेट दिल्लीपर्यंत विनणाऱ्या कासंबरी दर्गा परिसरात राहणाऱ्या अजिज याकूब कासकर (56) यांच्यासह चौघांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी एएसक्लब चौकात पकडले. त्यांच्या ताब्यातून एका अग्निशस्त्र, दोन जिवंत काडतूस, मोबाईलसह ब्लॅक रंगाची स्कॉपिओ जप्त करण्यात आली. कासकर हा मी सेवानिवृत्त डीवायएसपी असल्याचे सांगत होता.

सिडको वाळूज महानगरात 4 सप्टेंबर रोजी दिवसाढवळ्या घरफोडी झाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली. या सीसीटीव्हीत दिसणारी काळी स्कॉर्पिओ गाडी ही थेट कासंबरी दर्गापर्यंत पोहचली होती. पोलिसांनी या गाडीवर दररोज पाळत ठेवली असता ही गाडी बाहेर पडण्याची वेळ पोलिसांनी तपासली. त्यानुसार स्कॉर्पिओ ही एएस क्लब उड्डाणपुलाखाली येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहिती आधारे पोलिसांनी नाका बंदी केली.

सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास नगरनाका ते पंढरपूर चौकाकडे जाणाऱ्या रोडवरील एएस क्लब उड्डाणपुलाखाली सिग्नलजवळ स्कॉर्पिओ येताच पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर यांनी चालक सचिन बलभीम कोळपे (43, रा. कडू गल्ली, येळवी वाडा, ता. कराड, जि. सातारा, ह.मु. दर्गारोड मिटमिटा, पडेगाव) याच्या दरवाजाची काच वाजविली. त्याने काच खाली करताच गाडीची चावी काढून घेतली.

पोलिसांनी इशारा करताच पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मनोज शिंदे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, सहायक फौजदार दिनेश बन, हवालदार विनोद नितनवरे, जालिंधर रंधे, रेखा चांदे, सुरेश कचे, यशवंत गोबाडे, विशाल पाटील, नितीन इनामे, गणेश सागरे, समाधान पाटील यांनी एकदम झडप मारली. त्यात पोलिसांनी स्कॉर्पिओतील दरोड्यातील म्होरक्या अजिज याकूब कासरकर (56, रा. कासंबरी दर्गा, मिटमिटा, पडेगाव), विवेक माधवराव देशमुख (45, रा. प्रविणनगर, ता.जि. हिंगोली) आणि मस्तकिन मुस्ताक शेख (42, रा. नेहरूनगर, शकरपूर, पूर्व दिल्ली) या चौघांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्यांच्या स्कॉर्पिओची झडती घेतली असता एका गावठी कट्ट्यासह दोन जिंवत काडतूस, दोन स्क्रू ड्रायव्हर, घरफोडीसाठी लागणारे साहित्य, सहा मोबाईल, स्कॉर्पिओ कार आणि दोन वेगवेगळ्या नंबर प्लेट असा सुमारे 1 लाख 72 हजारांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणात एमाआयडीसी वाळूज ठाण्याचे अंमलदार गणेश रामभाऊ सागरे (38) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. अजिज कासकर हा स्कॉर्पिओने फिरत होता. दिवसा वाहनाने जाऊन चोरी, दरोड्याचे ठिकाण हेरत होता. त्यानंतर साथीदारांच्या मदतीने घर साफ करत होता. त्याच्या स्कॉर्पिओला पोलिसांनी अडविले असता तो थेट सेवानिवृत्त डीवायएसपी असल्याचे सांगत होता. त्यामुळे अनेकदा त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता.