सांताक्रुझमधील डोरीन फर्नांडिस यांचे वडिलोपार्जित घर पाडून तिथे भुजबळ कुटुंबीयांनी इमारत बांधली. मात्र या व्यवहारात थकीत असलेली रक्कम अखेर 20 वर्षांनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी कुटुंबीयांना दिली आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज दिली. भुजबळ कुटुंबीयांनी फर्नांडिस कुटुंबीयांना साडेआठ कोटींची थकबाकी दिली आहे. दमानिया यांनी फर्नांडिस कुटुंबीयांना थकबाकी मिळावी यासाठी पाठपुरावा केला होता.
सांताक्रुझ येथे डोरीन फर्नांडिस या 78 वर्षांच्या वृद्धा त्यांच्या तीन स्वमग्न मुलांसह (ऑटिस्टिक) राहतात. त्यांच्या राहत्या जागेवर 20 वर्षांपूर्वी छगन भुजबळ यांनी इमारत बांधली, मात्र ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे पूर्ण रक्कम दिली गेली नाही. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही महिन्यांपूर्वी फर्नांडिस कुटुंबीयांना प्रसारमाध्यमांसमोर आणून पुटुंबीयांची आर्थिक विपन्नावस्था दाखवली होती तसेच फर्नांडिस पुटुंबीयांना न्याय देण्याची विनंती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केली होती. मात्र आता ही थकीत रक्कम मिळाली असून डोरीन यांच्या मुलांच्या भविष्याची चिंता मिटली आहे. माझ्या आयुष्यातील सर्वाधिक समाधान देणारा हा क्षण आहे, अशी भावना दमानिया यांनी ‘एक्स’ या सोशल मीडियावर व्यक्त केली.
सुप्रिया सुळे यांचे मानले विशेष आभार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी फर्नांडिस कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांबद्दल दमानिया यांनी सुप्रिया सुळे यांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर दिलेल्या पाठिंब्याबद्दलही दमानिया यांनी संपूर्ण पवार कुटुंबीयांचे आभार मानले आहेत.