च्यूइंगम चघळताना तोंडात स्फोट, केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्याचा हृदयद्रावक मृत्यू

युक्रेनमध्ये एक हैराण करणारी घटना उघडकीस आली आहे. च्युइंगम चघळताना तोंडात स्फोट झाल्याने एका केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना युक्रेनमधील कनोताप शहरात घडली आहे. लिकोनोस असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे.

लिकोनोस स्फोटक पदार्थांवर संशोधन करत होता. च्युइंगमची चव वाढवण्यासाठी अनेकदा सायट्रिक अॅसिडचा वापर करत असे. पण यावेळी त्याने सायट्रिक अॅसिड समजून चुकून अतिशय धोकादायक स्फोटक पावडर च्युइंगममध्ये मिसळली. ही चूक त्याच्या जीवावर बेतली.

अहवालानुसार, लिकोनोसने च्युइंगम चघळायला सुरूवात करताच त्याच्या तोंडात एक भयानक स्फोट झाला. स्फोटात त्याचा जबडा आणि चेहऱ्याला गंभीर इजा झाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वैद्यकीय कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत लिकोनोसचा मृत्यू झाला होता.

घटनास्थळी सापडलेल्या 100 ग्रॅम पावडरची नेमकी ओळख अद्याप पटलेली नसली तरी बॉम्बशोधक पथकाने ते अत्यंत धोकादायक असल्याचे सांगितले.