श्री क्षेत्र शनि शिंगणापुरात चौथरा दुरुस्ती, सुशोभीकरणाचे काम सुरू

श्री क्षेत्र शनि शिंगणापुरात चौथरा दुरुस्ती व सुशोभीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कृष्ण ग्रॅनाईटचे नक्षीदार दगड बसवण्याचे काम हाती घेतले आहे. दुरुस्ती काम दोन महिने चालणार आहे. त्यामुळे चौथऱ्यावरील थेट दर्शन व्यवस्था बंद करण्यात आली आहे. काम पूर्ण होईपर्यंत शनी भक्तांना चौथर्‍यावरून दर्शन घेण्यासाठी दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

शनि महाराजांचा चौथरा आकर्षक व्हावा यासाठी पुणे येथील उद्योगपती वेंकीजग्रुपचे व्यंकटराव यांनी साठ लाख रुपये खर्चून दुरुस्तीचे काम करण्याची तयारी व इच्छा दर्शवली होती. त्यानुसार शनैश्वर देवस्थानने परवानगी दिली आहे. गेल्या सहा महिन्यापासून कर्नाटक व तामिळनाडू राज्यातील खाणीत काळा ग्रॅनाईट कृष्ण लीला दगड घडवण्याचे काम सुरू होते. मागील महिन्यात ते दगड मंदिरात आणण्यात आले आहेत. तसेच आठ दिवसापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.

नक्षीदार ग्रॅनाईट दगड बसवण्याचे काम कारागिरांनी सुरू केले असून चौथरा दुरुस्तीचे व सुशोभीकरणाचे काम दोन महिने चालणार आहे. दुरुस्तीचे काम हाती घेतले असल्याने शनिचे थेट चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी आता दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. मूळ चौथर्‍याच्या बाजूने खोदाई व पिचिंगचे काम संपले असून आता दगड बसवण्याचे काम सुरू आहे .

सध्याचा 18 बाय 18 असणारा चौथरा रुंदी वाढवून 21 बाय 21 करण्यात येत आहे. तीन फूट उंच व 16 इंच रुंद असलेला दगड या आकारात आहे. त्याच दगडात पायऱ्या व चौथर्‍याच्या जागेवर साकारणार आहे. नगर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूरात देश सह विदेशातील भक्तगण मोठ्या प्रमाणात येत असल्याने पुणे येथील दानशूर भाविकाने चौथरा दुरुस्ती काम देणगी स्वरूपात दिल्याने भावीक भक्तासह येथील गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. हे काम कर्नाटकातील कॉन्टॅक्टर व मजूर काम करत आहेत. चौथरा दुरुस्ती मुळे शनी भक्तांना थेट चौथऱ्यावरील प्रवेश बंद असल्याने आता दोन महिन्यानंतर दर्शन व्यवस्था खुली होण्यासाठी भाविकांना प्रतीक्षा करावी लागणार. आकर्षक चौथरा सुशोभकरणामुळे मंदिर परिसरातील रुपडे पालटणार आहे.