फडणवीसांच्या समोर खोक्यांची लूट! आमदार बंब यांच्या कार्यक्रमात लाभार्थ्यांची चंगळ

प्रचंड जाहिरातबाजी, पाण्यासारखा पैसा खर्च करून भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी विकास कामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू होताच लाभार्थ्यांना देण्यासाठी ठेवण्यात आलेल्या खोक्यांची पळवापळवी सुरू झाली. भाषण सोडून महिला, पुरुष मंडप उचकटून खोके पळवण्यासाठी धावले. हाताला लागतील तेवढे खोके घेऊन लाभार्थी निघून गेले. त्यामुळे फडणवीसांना रिकाम्या खुर्च्यांना आपले भाषण ऐकवावे लागले!

गंगापूर-रत्नपूर मतदारसंघाचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी उपसा जलसिंचन योजनेचा उद्घाटन कार्यक्रम ठेवला होता. सुलतानाबाद-आरापूर शिवारात होणार्‍या या कार्यक्रमासाठी प्रचंड जाहिरातबाजी करण्यात आली. लाभार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी कामगार कल्याण विभागाकडून तसेच महिलांसाठी आरोग्य विभागाकडून कीट देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. दुपारी 1 वाजता कार्यक्रम सुरू झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणाला उभे राहताच लाभार्थ्यांमध्ये चुळबूळ सुरू झाली. मागच्या भागातील काही लाभार्थी कीट ठेवण्यात आलेल्या ठिकाणचे पत्रे उचकटून आत घुसले. हे पाहताच समोर बसलेल्या महिला लाभार्थी भाषण सोडून कीट घेण्यासाठी सरसावल्या.

माझे भाषण झाल्यानंतर कीट वाटप करा

कामगार कल्याण विभागाचे तसेच आरोग्य विभागाचे कीट पळवण्यासाठी लाभार्थी पळाले. मंडप रिकामा झाला. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना आपले भाषण थांबवावे लागले. माझे भाषण झाल्यानंतर कीट वाटप करण्यात येणार आहे, कोणीही जागेवरून उठू नये, असे फडणवीस म्हणाले. परंतु त्यांचे ऐकण्यासाठी समोर लाभार्थीच नव्हते. रिकाम्या खुर्च्यांना फडणवीसांनी भाषण ऐकवले.

मिळेल तेवढे खोके पळवले

देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सोडून लाभार्थी कीट पळवण्यासाठी धावले. कीट ठेवण्यात आलेल्या मंडपात एकच गोंधळ उडाला. ज्याच्या हाताला जेवढे खोके लागतील तेवढे त्याने पळवले. काही महिला तर खोक्यावर खोके ठेवून त्यावर बसल्या. कीट वाटप करण्यात येणार आहे हे अगोदरच माहिती असलेल्या काही लाभार्थ्यांनी सोबतच गोण्या आणल्या होत्या. तेथेच खोके फाडून लाभार्थ्यांनी त्यातील साहित्य गोण्यांमध्ये भरून पळ काढला.