शहांना भेटायला वेषांतर करून जायचो! भाजपच्या कटाचे अजित पवारांनीच केले ‘वस्त्रहरण’

मिंधे आणि भाजपसोबत सत्तेत जाण्यासाठी स्वतःच केलेल्या कारनाम्यांचा अजित पवार यांनी स्वतःच पर्दाफाश केला आहे. दिल्लीत अमित शहा यांच्या भेटीसाठी मास्क आणि टोपी घालून विमानाने प्रवास केला. विमान प्रवासासाठी स्वतःचे नावही बदलले होते, अशी जाहीर कबुली अजित पवार यांनी देऊन टाकली.

नीती आयोगाच्या बैठकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला गेले होते. त्या वेळी खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा झाल्या. भाजपसोबत सत्तेत जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची साथ सोडली. त्या वेळी झालेल्या बैठका आणि दिल्लीपर्यंतच्या विमान प्रवासाचा या वेळी त्यांनी संपूर्ण घटनाक्रम कथन केला.

अजित पवार मोठे नटसम्राट

अजित पवार यांच्या या वेषांतर नाटय़ाचा शिवसेना नेते – खासदार संजय राऊत यांनी कडक शब्दांत समाचार घेतला. अजित पवार हे मोठे नटसम्राट आहेत. महाराष्ट्रात रंगमंच व नाटकाची मोठी परंपरा आहे. अगदी बालगंधर्व यांच्यापासून श्रीराम लागू, नाना पाटेकर, प्रशांत दामले यांची कामे आपण पहात आहोत. महाराष्ट्राच्या रंगमंचाने अनेक मोठे कलाकार दिले आहेत. पण या नाटय़सृष्टीने अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दुर्लक्ष केलेले दिसते. यांनाही रंगमंचावर नाटकात सहभागी करून घेतले पाहिजे. कारण इतक्या उत्तम पद्धतीने  ते मेकअप करतात, इतक्या उत्तम पद्धतीने आपले चेहरे बदलतात, इतक्या उत्तम पद्धतीने फिरत्या रंगमंचावर काम करतात, असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी मारला.

फडणवीसांची हुडी आणि गॉगल

भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केली. त्या वेळी फडणवीस यांच्या रात्री गुपचूप कशा भेटी घेतल्या, त्याची कबुली शिंदे यांनी दिली होती तर देवेंद्र हे हुडी घालून आणि गॉगल लावून रात्री शिंदे यांना भेटायला जायचे असे अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या.

. ए. पवार नावाने बोर्डिंग पास!

भाजपसोबत महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या दहा बैठकांचा तपशील अजित पवारांनी सांगितला. दिल्लीला जाण्यासाठी त्यांनी स्वतःची ओळख लपवली. सामान्य प्रवाशाप्रमाणे मुंबई ते दिल्लीपर्यंतचा प्रवास केला. विमान प्रवास करण्यासाठी अजित पवार या नावाऐवजी ए.ए. पवार या नावाने बोर्डिंग पास तयार केला जात होता, अशी माहिती त्यांनीच अनौपचारिक गप्पांमध्ये दिली.

मास्क आणि टोपी घालून प्रवास

अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकांसाठी दिल्लीला जाताना तोंडावर मास्क व टोपी घालून प्रवास केला. यामुळे सहप्रवाशांनी आपल्याला ओळखले नाही, असे अजित पवार यांनीच सांगितले.