चंद्रशेखर बावनकुळेंच्या संस्थानला 5 कोटींचा भूखंड फुटकळ दरात दिल्याचा आरोप, वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

महायुती सरकारमधील भ्रष्ट कारभाराचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. भूखंडाचे ‘श्रीखंड’ खाण्याचा प्रकार सत्तधारी भाजपच्या नेत्यानेच केल्याचा आरोप होत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या यांच्या संस्थेला 5 कोटींचा भूखंड फुटकळ दरात देण्यात आल्याचा आरोप आहे. यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संस्थेला शासकीय भूखंड देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. अजित पवार यांचे अर्थ खाते आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या महसूल खात्याचा विरोध असूनही बावनकुळे यांच्याशी संबंधित असलेल्या ‘महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी’ या संस्थेला तंत्रशिक्षण आणि नर्सिंग महाविद्यालय उभारण्यासाठी पाच हेक्टरचा भूखंड बहाल करण्यात आला आहे. रेडीरेकनर दरानुसार या भूखंडाची किंमत तब्बल पाच कोटी इतकी असल्याचे सांगितले जाते. मात्र, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संस्थेला हा कवडीमोल दरात देण्यात आला आहे. ‘एबीपी माझा’ने हे वृत्त दिले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संबंधित महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी या संस्थेला भूखंड देताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणतीच चर्चा झाली नाही. हा निर्णय कागदोपत्री घेण्यात आला. तर 2019 च्या शासन निर्णयाप्रमाणे रेडी रेकनर भरून हा भूखंड देण्यात यावा, असा अभिप्राय महसूल विभागाने दिला होता. मात्र, त्यानंतरही फुटकळ दरात हा भूखंड बावनकुळेंच्या संस्थेला देण्यात आला. चंद्रशेखर बावनकुळे हे महालक्ष्मी जगदंबा संस्थान या सार्वजनिक देवस्थान- सार्वजनिक न्यासाचे अध्यक्ष आहेत. मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्यापाठोपाठ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याही संस्थानला भूखंड दिल्याने महायुती सरकारचा भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी या संस्थेकडून महादुला कोराडी येथे सेवानंद विद्यालय चालवले जाते. या संस्थेला आता कनिष्ठ महाविद्यालय आणि तंत्रशिक्षण व नर्सिंग महाविद्यालय सुरू करायचे आहे. त्यासाठी सरकारकडे जागेची मागणी करण्यात आली होती. तिन्ही महाविद्यालये उभारण्यासाठी इमारत, प्रयोगशाळा, खेळाचे मैदान आणि इतर सुविधांसाठी आपल्याला 5.04 हेक्टर जागा हवी असल्याची विनंती संस्थेने राज्य सरकारला केली होती. रेडीरेकनरनुसार या जमिनीचा भाव 4 कोटी 86 लाख इतका आहे. मात्र, आम्ही शैक्षणिक कार्यासाठी हा भूखंड वापरत असल्याने राज्य सरकारने या किंमतीत सूट द्यावी, अशी मागणी बावनकुळे यांच्या संस्थेने केली होती. त्यानुसार राज्य सरकारने हा भूखंड नाममात्र दरात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संस्थेला दिल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.

जमिनी खाण्यात हे लोक वस्ताद – वडेट्टीवार

जमिनी खाण्यात हे लोक फार वस्ताद आहेत. सगळ्या प्राईम लँड सगळ्या जमिनी भाजपने सरसकट घशात घालण्याचे काम सुरू केले आहे. महाराष्ट्राचे हे खऱ्या अर्थाने जमीन लुटारू सरकार म्हणून याची ओळख होणार आहे. सगळ्या शहरांतल्या जमिनी त्यांच्या संस्थांना, त्यांच्या मोठ-मोठ्या डेव्हलपर्सना बिल्डर्सना रेडिरेकनरच्या 25 टक्के दराने दिल्या. 5 लाख कोटीच्या जमिनी यांनी आतापर्यंत वाटलेल्या आहेत, असा गंभीर आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भूखंड प्रकरणावरून केला आहे.

बावनकुळे यांचं स्पष्टीकरण…

महालक्ष्मी जगदंबा संस्थान आहे, माझी व्यक्तिगत संस्था नाही. मी फक्त संस्थानच्या कार्यकारणीचा अध्यक्ष आहे. धार्मिक स्थळावर अनिल देशमुखही दर्शन घ्यायला येतात. आई महालक्ष्मीचं दर्शन घेऊन वडेट्टीवार फॉर्म भरतात. नाना पटोलेही आई महालक्ष्मीचं दर्शन घेतल्याशिवाय फॉर्म भरत नाही, असे स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.