सत्याचा शोध – नारायण नागबळीचे बळी

>> चंद्रसेन टिळेकर

अलीकडे नारायण नागबळी हा विधी करण्याचे प्रस्थ आपल्या महाराष्ट्रात भलतंच माजलं आहे. भाबडय़ा लोकांची फसवणूक करण्याचा तो राजरोस धंदा झाला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती याबाबत प्रबोधन करीत आहे. तरीही अशा भंपक विधींना बळी पडण्याचे प्रमाण लक्षवेधी आहे.

काही दिवसांपूर्वी निवांत बसलो असताना सकाळी सकाळीच उरळीकांचन गावाजवळील एका गावावरून फोन आला. ‘‘साहेब, मला जरा नारायण नागबळीबद्दल आपल्याला विचारायचं होतं.’’

‘‘का? तुम्हाला तो करायचा आहे का?’’

‘‘करणार होतो, पण आता करणार नाही.’’

‘‘का?… आणि करणार तरी कशासाठी होतात?’’

‘‘साहेब, आमची पाच एकर जमीन आहे. आतापर्यंत उत्तम पिकं निघत होती, पण गेली तीन-चार वर्षे झाली तुम्हाला सांगतो, पिकाला उताराच मिळत नाही.’’

‘‘मग त्यासाठी नारायण नागबळी का?’’

‘‘फक्त त्यासाठीच नाही साहेब. गेले वर्ष, दीड वर्ष आमच्या घरात कोणाकोणाला सारखं आजारपण होतंय बघा. दोन-तीन डॉक्टर झाले, पण आराम पडत नाही. आम्ही अगदी वैतागून गेलो होतो बघा. शेवटी एका ज्योतिष्याकडे गेलो आणि त्याचा सल्ला घेतला. ते म्हणाले, तुमच्या घराण्याला कालसर्पयोग आहे. तुमच्या पूर्वजांपैकी कोणाकडून तरी सापाची नाहीतर नागाची हत्या झालेली आहे. त्याचा कोप तुम्हाला भोवतोय. लवकरात लवकर उपाय करा.’’

‘‘काय उपाय सांगितला मग त्यांनी?’’

‘‘ते म्हणाले, नारायण नागबळी करावा लागेल. नाशिकला त्र्यंबकेश्वरी सगळ्यात उत्तम सोय आहे. तीस हजार रुपये खर्च येईल. तीन दिवस राहावे लागेल. तिथले पुरोहित तिकडे तुमची सगळी उत्तम सोय करतील. तुम्हाला छोटासा सोन्याचा नाग गंगेला अर्पण करावा लागेल.’’

‘‘मग का नाही केला तुम्ही तो विधी?’’

‘‘अहो, माझ्या भावाला त्याच्या एका मित्राने तुमचं ते पुस्तक आहे ना, ‘अंधश्रद्धेची वावटळ’ ते दिलं आणि तो म्हणाला, या पुस्तकात नारायण नागबळीबद्दल माहिती दिली आहे. आम्ही तिघा भावांनी ते पुस्तक वाचलं आणि ठरवलं, असला विधी काही करायचा नाही.’’

‘‘विधी नाही करायचा असं ठरवलं ना उत्तम, मग?’’

‘‘एकदा तुमच्याशी बोलून खात्री करून घ्यावी की ज्योतिष्याने सांगितलेला उपाय नाही केला तर काही मोठं बालंट तर येणार नाही ना आमच्या घराण्यावर?’’

‘‘अहो, काही ना काही संकटं आल्यावर ती टळावीत म्हणून खूप लोकांनी हे विधी केलेले मला माहीत आहेत आणि त्यांना त्याचा काडीचाही फायदा झाला नाही हेही मला माहीत आहे. आता तुम्हीच काय ते ठरवा.’’

‘‘पण मग साहेब, ज्योतिषी असा सल्ला का देतात?’’

‘‘अहो, हा त्यांचा व्यवसाय आहे. आपल्या अज्ञानावर, अडाणीपणावर तर त्यांचं पोट भरतं ना? तुम्ही जे तीस हजार खर्च करणार ना, त्यातले पाच हजार त्या ज्योतिष्याला कमिशन म्हणून मिळणार असतात.’’

‘‘पण मग ते सापाचा कोप झालाय, त्याने डूख धरलाय… त्याचं काय?’’

‘‘अहो, त्या सगळ्या मुद्दाम पसरवलेल्या अंधश्रद्धा. सापाला अशी स्मरणशक्ती मुळीच नसते. त्याची बुद्धी तेवढी तल्लख नसते. तेव्हा तो डूख कसा काय धरणार सांगा बरं मला! आपला समाज विचार करण्याचा आळस करतो. आपले पु.ल.याला बौद्धिक आळस म्हणतात.’’

‘‘पण साहेब, पीक परत पहिल्यासारखं यावं यासाठी काय करावं?’’

‘‘अहो, सारखी सारखी पिकं घेऊन मातीचा कस उतरतो. यासाठी माती परीक्षण करून नेमकं कोणतं खत वापरायचे याचा योग्य तो सल्ला घ्या. तेव्हा पहिलं माती परीक्षण करून घ्या. नारायण नागबळी नाही.’’

‘‘मान्य आहे, पण साहेब घरातल्या पोरांना सारखं आजारपण येतंय, त्याचं काय करायचं?’’

‘‘अहो, मुलांना छोटे मोठे आजार होतच असतात. त्यातून तुम्हाला जर चांगला डॉक्टर मिळाला नाही, तर तो आजार बरा व्हायला वेळ लागतो एवढंच!’’

‘‘लई उपकार झाले साहेब, तुमचा भरपूर वेळ घेतला बघा.’’ असं म्हणून त्यांनी फोन खाली ठेवला.

अलीकडे नारायण नागबळी हा विधी करण्याचे प्रस्थ आपल्या महाराष्ट्रात भलतंच माजलं आहे. संकटाने पिडलेल्या सर्वसामान्य भाबडय़ा जणांची फसवणूक करण्याचा तो राजरोस धंदा झाला आहे. खरं तर ज्योतिष परिषदेने या विधीचा धिक्कार केला आहे आणि जनतेने मुळीच या विधीच्या फंदात पडून बळी जाऊ नये असं आवाहनही केलं आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर गावागावांत जाऊन या आणि अशा अंधश्रद्धांच्या विरोधात नित्याने प्रबोधन करीत आहे. तरीही रोज शेकडोच्या संख्येने हा विधी प्रामुख्याने नाशिकसारख्या तीर्थक्षेत्री केला जातो. रोज लक्षावधी रुपयांची उधळण होते. त्यामुळेच की काय, यापूर्वी दोनदा नाशिक क्षेत्री हाणामारी झाली आहे. पहिली दंगल ही नाशिक मधल्याच स्थानिक पुरोहितांमध्ये झाली होती. विधी करायला आलेल्या भाविकांनी (चपखल शब्दात सांगायचं तर गिऱहाईकांनी) आपल्याकडेच यावं म्हणून दोन गटांत रस्सीखेच होऊन त्याचं पर्यवसान हाणामारीत झालं होतं. त्यानंतर दुसरी दंगल झाली ती नाशिकमधलेच नेहमीचे पुरोहित आणि परप्रांतातून, विशेषतः उत्तर हिंदुस्थानातून आलेल्या भटजी यांच्यामधली. या विधीच्या निमित्ताने इथे कोटय़वधी रुपयांचा धंदा चालतो ही खबर वणव्यासारखी उत्तर हिंदुस्थानातल्या पुरोहित वर्गात पसरली. परिणामी त्यांनी जथ्याजथ्याने नाशिकच्या गंगेकाठी येऊन आपलं ठाण मांडलं आणि मिळेल त्या दक्षिणेत हा विधी करायला सुरुवात केली. स्थानिक पुजाऱ्यांची दुकानं अर्थातच ओस पडायला लागली. नाही म्हटलं तरी त्यांच्या छान सुटलेल्या पोटावर चांगलाच पाय पडू लागला होता. शेवटी दोन गुंडांच्या टोळीत जसं टोळीयुद्ध होतं तसं स्थानिक पुजारी अन् परप्रांतीय भटजी यांच्यात एका रात्री रण पेटलं. तुफान हाणामारी झाली. पोलिसांनी हे दृश्य पाहिलं आणि ती दंगल आटोक्यात आणली. अन्यथा दोन्ही बाजूंचे दोन-चार पुरोहित मोक्षाला सहज गेले असते.

एवढे सगळे महाभारत अनेक वृत्तपत्रांत छापूनही आलं तरी श्रद्धाळू जनांनी त्यापासून काही बोध घेतलाय असं दिसत नाही. कारण अजूनही फसवणुकीचा धंदा जोरात आहे. ज्योतिष्यांच्या मखलाशीप्रमाणे पत्रिकेत सगळे ग्रह राहू अन् केतू या दुष्ट ग्रहांच्या समवेत एकत्र एका बाजूला आले की, त्या व्यक्तीला कालसर्पयोग भोगावा लागतो, पण गंमत म्हणजे राहू – केतू नावाचे असे कोणतेही ग्रह अवकाशात नाहीत, तर ते केवळ ग्रहकक्षांचे छेदन बिंदू आहेत हे शाळकरी पोरही सांगेल. जे शाळकरी पोरांना कळतं ते शिकल्यासवरलेल्या मोठय़ा माणसांना कळू नये?

(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडित आहेत.)