चंद्रकांतदादांच्या चॉकलेटची विधिमंडळात गोड चर्चा

विधिमंडळात आज पहिल्याच दिवशी एक असा प्रसंग घडला की त्याची खुमासदार चर्चा विधान भवनातच नव्हे तर परिसरातही रंगली होती. उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे डार्क चॉकलेट घेऊन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात गेले. तिथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार अनिल परब आणि विलास पोतनीस आधीच हजर होते. उद्धव ठाकरे यांना पाहताच पाटील थोडे चपापले. चंद्रकांतदादांचे स्वागत करत दानवे यांनी त्यांना पेढा दिला. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवल्याबद्दल तोंड गोड करा, असे दानवे म्हणाले. त्यावर चंद्रकांतदादांनी तो पेढा अनिल परब यांना देत त्यांचे ‘अॅडव्हान्स’ अभिनंदन करत विधान परिषद निवडणुकीत त्यांच्या विजयावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच केले.

उद्धव ठाकरे यांनी दादांना ‘बसा जरा गप्पा मारूया’ असे आवाहन केले, मात्र दादांनी तिथून काढता पाय घेतला. जाताना दानवे यांना द्यायला आणलेले डार्क चॉकलेटही ते सोबत घेऊन निघाले होते. त्यावर दानवे यांनी ‘दादा, माझे चॉकलेट तरी द्या,’ असे म्हणताच खसखस पिकली. चंद्रकांतदादांनी चॉकलेट घाईघाईत दानवे यांच्या हाती देत तिथून निरोप घेतला.