बांगलादेश संघाच्या प्रशिक्षकपदावरून हथुरुसिंघे यांची हकालपट्टी

बांगलादेश संघातील खेळाडूबरोबर गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) संघाचे मुख्य प्रशिक्षक चंडिका हथुरुसिंघे यांना दोन दिवसांपूर्वीच निलंबित केले होते. मात्र, तातडीच्या बैठकीनंतर हथुरुसिंघे यांनी घडलेल्या घटनेबाबत दिलेले स्पष्टीकरण असमाधानकारक मानत निलंबनाची कारवाई योग्य असल्याचे बीसीबीने सांगितले. त्यांनी बांगलादेशच्या क्रिकेटपटूवर हल्ला केला. तसेच त्यांनी करारात नमूद केलेल्यापेक्षा जास्त रजा घेतली. याबाबत बोर्डाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितले होते.

हथुरुसिंघे यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंडळाची गुरुवारी आपत्कालीन बैठक बोलावून प्रतिक्रिया दिली. मात्र, सर्व बाबींचा विचार केल्यानंतर बोर्डाने आपला निर्णय कायम राखला. बांगलादेशचे प्रशिक्षक म्हणून हथुरुसिंघे यांचा दुसरा कार्यकाळ जानेवारी 2025 पर्यंत आहे. फिल सिमन्स यांची फेब्रुवारी 2025 मध्ये होणाऱ्या आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.