Champions Trophy PAK vs BAN – पावसामुळे सामना रद्द; यजमान पाकिस्तानसह बांगलादेश स्पर्धेतून बाहेर

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गुरुवारी बांगलादेशचा सामना पाकिस्तानशी होणार होता. मात्र, हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. पावसामुळे नाणेफेकही झाली झाली नाही. सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एकएक गुण देण्यात आला. हे दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उपांत्य फेरीच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडले होते. मात्र, आता यजमान पाकिस्तान अ गटात अखेरच्या स्थानी आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेश, पाकिस्तान, हिंदुस्थान आणि न्यूझीलंड अ गटात होते. या गटातून हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. मात्र, या दोन्ही संघापैकी प्रथम स्थानावर कोण असणार, याची चुरस आहे. प्रथम स्थानावर असलेल्या संघाचा मुकाबला ब गटात दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाशी होणार आहे. त्यामुळे प्रथम स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघात चुरस आहे. या गटात बांगलादेश तिसऱ्या स्थानावर तर पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण होता, मात्र, नेट रन रेटच्या आधारावर बांगलादेश गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.

बांगलादेशचा पहिल्या सामन्यात हिंदुस्थानकडून 6 विकेट्सने पराभव झाला होता. तर न्यूझीलंडकडून 5 विकेट्सने पराभव झाला होता. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 60 धावांनी पराभव केला होता. तर टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारत 6 गडी राखत विजय मिळवला होता. त्यामुळे टीम इंडिया आणि न्यूझीलंड उपांत्य सामन्यात पोहचले होते. तर पाकिस्तान आणि बांगलादेश दोन्ही संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. आता ब गटातून उपांत्या सामन्यात कोण विजय मिळवणार याची क्रिकेट रसिकांना उत्सुकता आहे.