बांगलादेशातील अल्पसंख्याकांना केंद्र सरकारने संरक्षण दिले पाहिजे. तसेच जे भारतात परत येण्यास इच्छुक आहेत त्यांना परत आणले पाहिजे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले. तसेच काही लोकांना जातीय तेढ निर्माण करायची आहे. त्यामुळे बनावट व्हिडीओ हेतुपुरस्सर प्रसारित केले जात आहेत, असा दावा ममता यांनी केला.
बांगलादेशातील अल्पसंख्याकांना संरक्षणाची गरज आहे. केंद्र सरकारने यात लक्ष घालायला हवे. ज्यांना हिंदुस्थानात परतायचे आहे त्यांना मदत केली पाहिजे. मी याआधीच विधानसभेत बोलताना बांगलादेशबद्दल भाष्य केले आहे. काही बनावट व्हिडीओ व्हायरल करून लोकांची दिशाभूल केली जात आहे. सरकारने प्रतिनिधी पाठवला असून ही त्यांची जबाबदारी आहे. माझ्या माहितीनुसार व्हिसा जारी करण्याचे प्रमाण वाढविण्यात आले आहे जेणेकरून त्या देशातील अधिक लोक परत येऊ शकतील, असेही ममता यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू आहेत. शेजारील देशात 170 दशलक्ष लोकसंख्येपैकी सुमारे आठ टक्के अर्थात जवळपास 13 दशलक्ष हिंदू आहेत. ऑगस्टमध्ये बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग सरकारचे पतन झाल्यानंतर बांगलादेशात हिंसाचाराची आग भडकली. तेथील विविध जिह्यांतील हिंदूंची प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त करण्यात आली.