मोदींच्या सेल्फी पॉईंटची मध्य रेल्वेकडून लपवाछपवी!

रेल्वे स्थानकांमध्ये उभारण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेल्फी पॉईंटवर सर्वसामान्यांकडून टीका होऊ लागल्याने मध्य रेल्वेनेही आता लपवाछपवी सुरू केली आहे. रेल्वे बोर्डाच्या निर्देशानुसार मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकात तीन तात्पुरते तर एक कायमस्वरूपी थ्रीडी सेल्फी पॉईंट उभारला आहे. याबाबत मध्य रेल्वेकडे माहिती अधिकारांतर्गत विचारणा केली असता रेल्वेने सीएसएमटी स्थानकात केवळ तात्पुरते सेल्फी पॉईंट उभारल्याचे म्हटले आहे, मात्र त्याचा आकडा उघड केला नाही. तसेच कायमस्वरूपी सेल्फी पॉईंट उभारल्याचे रेल्वेला माहीतच नसल्याचे दिसत आहे. यावरून मध्य रेल्वे सेल्फी पॉईंट, त्यांची संख्या आणि त्याचा लाखो रुपयांचा खर्च लपवत असल्याचे समोर आले आहे.

दीड कोटीची उधळपट्टी
मध्य रेल्वेने आरटीआयअंतर्गत दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आपल्या पाच विभागात 30 तात्पुरते आणि 20 कायमस्वरूपी सेल्फी पॉईंट उभारले आहेत. त्यावर रेल्वेकडून तब्बल 1 कोटी 57 लाख रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या विविध योजनांची जाहिरात करण्यासाठी रेल्वेकडून बहुतांश स्थानकांत सेल्फी पॉईंट उभारले आहेत. त्यामध्ये पंतप्रधानांची प्रतिकृती, योजनांचे लोगोची आकर्षक रचना करण्यात आली आहे. याबाबतची माहिती आरटीआयअंतर्गत उपलब्ध झाली आहे. त्यानुसार मध्य रेल्वेच्या 30 स्थानकांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात सेल्फी पॉईंट उभारण्यात आले असून त्यावर प्रत्येकी सव्वा लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. तसेच 20 स्थानकांमध्ये कायमस्वरूपी सेल्फी पॉईंट उभारले असून त्यावर प्रत्येकी सव्वासहा लाख रुपये खर्च केल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे. मात्र सीएसएमटी स्थानकात फलाट क्रमांक नऊच्या समोर उभारण्यात आलेल्या कायमस्वरूपी सेल्फी पॉईंटवर सव्वा लाख रुपये खर्च करण्यात आलेले असतानाही रेल्वेकडून त्याबाबतची माहिती लपवली जात आहे. रेल्वे प्रशासनाने अशा किती ठिकाणची माहिती लपवली, असा सवाल प्रवाशांकडून केला आहे.