कोण म्हणतं, केंद्र सरकार स्थिर आहे… खेला तर होणारच! ममता बॅनर्जींचा आक्रमक पवित्रा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आज मुंबई दौऱ्यात ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी नरेंद्र मोदी सरकारवर सडकून टीका केली. मोदी सरकारच्या राजवटीतच देशात खरी आणीबाणी सुरू आहे, असे ममता म्हणाल्या. कोण म्हणतं मोदी सरकार स्थिर आहे, असा सवाल करतानाच खेला तो शुरू हो गया है और खेला चलते रहेगा, असे सूचक विधानही या वेळी ममतांनी केले. ममता यांनी नंतर सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेऊन चर्चा केली.

ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर दोघांनीही पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ममतादीदी या मुंबईत आल्यानंतर आपल्याला भेटत असतात, ही राजकीय भेट नव्हे तर कौटुंबिक भेट होती, असे उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले. यापूर्वीही दीदी मातोश्रीवर आल्या होत्या आणि यापुढेही त्यांनी येत रहावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यानंतर ममता बॅनर्जी यांच्याशी संवाद साधला. देशात आणीबाणी लागू झाली तो 25 जून हा दिवस मोदी सरकार ‘संविधान हत्या दिन’ म्हणून साजरा करणार आहे. त्याबद्दल विचारले असता ममता बॅनर्जी यांनी तसे करणे अयोग्य आहे, असे सांगितले. मोदी यांच्या काळातच देशात आणीबाणीसारखे वातावरण आहे. न्याय संहितेच्या नावाखाली त्यांनी फौजदारी कायद्यांमध्ये अनेक बदल केले आहेत. विरोधी पक्षातील खासदारांना निलंबित करून तीन विधेयके संसदेत मंजूर केली. नव्या कायद्यांमध्ये काय आहे हेच नेमके समजत नाही. कारण त्यासंदर्भात सरकारने खासदारांशी चर्चाच केली नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

खरी आणीबाणी तर नरेंद्र मोदींच्या काळात लागू झाली

आणीबाणीचे आम्ही समर्थन करत नाही, पण भाजपने याचा विचार स्वतःपासून करण्याची गरज आहे. आणीबाणीच्या काळात मोदींसारखे मनमानी निर्णय घेण्यात आले नव्हते. त्या वेळीही चर्चा करण्यात येत होती.

 ममता बॅनर्जी

उद्धव ठाकरे वाघासारखे लढले

शिवसेनेचे नाव आणि चिन्ह चोरण्यात आले, तरीही उद्धव ठाकरे यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे भाजपचा मुकाबला केला, लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे हुकूमशाहीविरुद्ध वाघासारखे लढले, असे कौतुकोद्गार ममता बॅनर्जी यांनी काढले.

शिवसेनेचा प्रचार करणार

महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत एकजूट असून ही एकजूट कायम राहील, असा ठाम विश्वास ममता बॅनर्जी यांनी या वेळी व्यक्त केला. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचा प्रचार करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

केंद्रातील सरकार स्थिर नाही, अस्थिर आहे, असे ममता म्हणाल्या. केंद्रातील सरकार स्थिर नाही, असे कसे तुम्ही म्हणू शकता, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, मोदी सरकार स्थिर कसे आहे ते तुम्ही सांगा, असा उलट सवाल ममतांनी केला. सरकार अस्थिर करण्यासाठी तुम्ही चंद्राबाबू नायडू किंवा नितीश कुमार यांच्या संपर्कात आहात का, असे विचारले असता मला कुणाच्या विरोधात आणि कुणाच्या बाजूनेही बोलायचे नाही, असे उत्तर ममतांनी दिले. या वेळी खेला होणार का, असे विचारले असता ‘‘खेला तो शुरू हो गया है, और खेला चलते रहेगा,’’ असे सूचक विधान त्यांनी केले.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी रश्मी ठाकरे, शिवसेना नेते – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे उपस्थित होते.

मुंबई दौऱ्यात ममता बॅनर्जी यांनी सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली. या वेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार उपस्थित होते.