मुंबई-गोवा महामार्गाच्या 2 कंत्राटदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा, इंजिनीअरला अटक; चेतक एण्टरप्रायजेस आणि अ‍ॅपको इन्फ्रास्ट्रक्चरवर कठोर कारवाई

मुंबई-गोवा महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने करतानाच ते वर्षानुवर्षे लटकवून ठेवणाऱ्या ठेकेदार कंपनीवर महामार्ग प्राधिकरणाने कारवाईचा बडगा उगारला आहे. इंदापूरपासून पुढील रस्त्याचे काम करणाऱ्या चेतक एण्टरप्रायजेस आणि त्यांची उपकंपनी असलेल्या अ‍ॅपको इन्फ्रास्ट्रक्चरचे व्यवस्थापकीय संचालक हुकमीचंद जैन, जनरल मॅनेजर अवधेशपुमार सिंह, प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित कावळे यांच्याविरोधात माणगाव पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अभियंता सुजित कावळे यांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या इंदापूर ते वडपाले या 26.7 किमी अंतर चौपदरीकरणाच्या कामासाठी केंद्र सरकारने निविदा काढली होती. त्यात चेतक एण्टरप्रायजेसने आणि त्यांची उपकंपनी असलेल्या अॅपको इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने हा ठेका मिळवून 18 डिसेंबर 2017 पासून काम सुरू केले होते.

तीन वेळा कारणे दाखवा नोटीस

मुंबई-गोवा महामार्गाच्या आधुनिकीकरणाच्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या जागेपैकी 91.80 टक्के इतकी बोजारहित जागा शासनाने ठेकेदारांना हस्तांतरित केली होती. ठेकेदारांनी या चौपदरीकरणाचे काम 2019 पर्यंत पूर्ण करायचे होते. त्या अवधीत काम पूर्ण झालेच नाही. त्यामुळे ठेकेदाराला आणखी मुदतवाढ देण्यात आली  होती. मात्र त्यानंतरही या मुदतवाढीच्या काळात दर महिन्याला किमान 10 टक्के वेगाने काम पूर्ण होणे आवश्यक असतानाही ते अवघे 4.6 टक्के या  वेगाने करण्यात आले. त्यामुळे कंत्राटदाराला महामार्ग प्राधिकरणाकडून तीन वेळा कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. ठेकेदाराने केलेल्या कामाचा दर्जा केंद्र सरकारच्या गुणवत्ता नियंत्रण तपासणाऱ्या ब्लूम एलएलसी, यूएसए कंपनीने निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत कंत्राटदाराला नोटिसा दिल्या. मात्र त्यांच्या कामात काहीही फरक पडला नाही.

कामाची अशी वाट लावली; 170 अपघात, 99 बळी, 208 जायबंदी

z काम पूर्ण झालेल्या ठिकाणांपैकी काही ठिकाणी कामासाठी डायव्हर्जन घेण्यात आले. त्यामुळे महामार्गाच्या एकाच लेनवरून जाणारी व येणारी वाहने चालकांना धोकादायक अवस्थेत चालवावे लागत होते.

z ज्या ठिकाणी काम पूर्ण झाले नाही त्या ठिकाणी रस्त्याचा भाग उखडून जागोजागी खड्डे पडले.

z काही ठिकाणी नव्याने करण्यात आलेला रस्ता आणि जुना रस्ता यातील काही भाग खोदून तो अपूर्णावस्थेत ठेवला, परंतु त्या ठिकाणी कोणत्याही सुरक्षा उपाययोजना केल्या नाहीत.

z महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अशा धोकादायक परिस्थितीची जाणीव व अंदाज येत नव्हता. परिणामी अर्धवट काम सोडून धोकादायक स्थितीत ठेवलेल्या या महामार्गावर त्या भागात 170 अनेकदा अपघात झाले. ज्यात 97 प्रवासी गंभीर जखमी तर 208 प्रवासी जायबंदी झाले.

z चेतक एण्टरप्रायजेसची उपकंपनी असलेल्या अॅपको इन्फ्रास्ट्रक्चरने इंदापूर ते वडपाले या मार्गावरील आधुनिकीकरणाचे काम मुदतीत पूर्ण केले नाहीच, उलट ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले. अपूर्ण असलेल्या कामाच्या ठिकाणी थर्मोप्लास्टिक पेंट (पांढऱ्या रंगाच्या पट्टय़ा), पॅट आईस, डेलिनेटर, वाहनचालकांच्या माहितीसाठी माहिती सूचना फलक लावणे, अनधिकृत रस्ते दुभाजक बंद करणे आवश्यक होते, परंतु त्यांनी या उपाययोजना केल्या नाहीत. परिणामी प्रवाशांचे बळी गेले.