अश्लील नृत्य करणाऱ्या नृत्यांगणांसह 14 जणांवर गुन्हा, करवीर तालुक्यातील म्हारूळ गावातील प्रकार

विसर्जन मिरवणुकीत नृत्यांगणांकडून अश्लील हावभाव करीत नृत्य सुरू होते. मंडळाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकही या नृत्यांगणांकडे पाहून हावभाव करत होते. अशाप्रकारे गणेशोत्सवात भावना दुखावणारे कृत्य करणाऱया नृत्यांगणांसह 14 कार्यकर्त्यांवर करवीर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. करवीर तालुक्यातील म्हारूळ गावात 13 सप्टेंबरला रात्री हा प्रकार घडला.

गणेशोत्सवाचे पावित्र्य राखा, महिलांचे अश्लील नृत्यांचे कार्यक्रम ठेवू नका, अशा सूचना पोलीस अधीक्षकांनी गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत दिल्या होत्या. करवीर ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी आपल्या हद्दीत मंडळांकडून असे कृत्य होऊ नये, याची दक्षता घेत होते. प्रत्येक गावात मंडळांना याबाबत सूचना केल्या होत्या. जी मंडळे असे गैरप्रकार करण्याची शक्यता होती, त्यांना नोटिसाही बजावल्या होत्या.

शुक्रवारी (दि. 13) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास म्हारूळ गावातील शिवस्वराज तरुण मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत सोनिया गायकवाड यांच्या डान्स ग्रुपचा कार्यक्रम ठेवला होता. सोनियासह तिच्या अन्य दोन सहकारी नृत्यांगणा डीजेवर अश्लील नृत्य करीत होते. त्यांचा डान्स पाहून कार्यकर्ते आणि हुल्लडबाज नागरिकही अश्लील हावभाव करून नृत्य करत होते.

हा प्रकार मिरवणूक पाहण्यास आलेल्या लोकांना, गणेशभक्तांना विचित्र व पावित्र्य भंग करणारा वाटत होता. याबाबत महिला व तरुणींनी नाराजी व्यक्त केली. गणेशमूर्तीसमोर असे कृत्य करणे म्हणजे भावना दुखावणारे होते. करवीर पोलिसांनी याप्रकरणी सोनिया गायकवाड व तिच्या सहकारी दोघी नृत्यांगणा, सागर बळवंत चौगले, प्रदीप शंकर मगदूम, युवराज नामदेव गुरव, संदीप नामदेव कोळी, सागर, सदाशिव चौगुले, अजित कुंडलिक चौगुले, शिवाजी शामराव कवडीक, सतीश धोंडिराम मगदूम, संदीप केरबा चौगले, अमर बाजीराव मगदूम, ओंकार संभाजी कवडीक, अर्जुन बापू मगदूम (सर्व, रा. म्हारूळ, ता. करवीर) अशा 14 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत हेड कॉन्स्टेबल सुभाष वरूटे यांनी फिर्याद दिली.

नोटिसीकडे दुर्लक्ष अन् मनमानी

n करवीर तालुक्यातील काही गावांमध्ये अशाप्रकारे नृत्यांगणा आणून त्यांचे डान्स ठेवले जातात. या नृत्यांगणा अश्लील हावभाव करून पावित्र्य भंग करतात. त्यातून काहीवेळा वादावादीचे प्रसंग घडले आहेत. त्यामुळे पोलिसांनी असे कृत्य करण्याची शक्यता असणाऱया मंडळांना अगोदरच नोटीस देऊन समज दिली होती. मात्र, पोलीस काय करतील ते पाहू, अशी अरेरावी करणाऱया म्हारूळ येथील मंडळाने पोलिसांच्या नोटिसीकडे दुर्लक्ष करून मनमानी केल्यामुळे गुन्हा दाखल झाला.

…तर फोडून काढणार

n नृत्यांगणा नाचवणे, डीजे लावून आदेश मोडणे, मिरवणुकीत वादावादी, भांडण असे कृत्य करणाऱयांची गय केली जाणार नाही. अश्लील नृत्य आढळल्यास संबंधित मंडळांना फोडून काढले जाईल, असा इशारा करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिला होता. तरीही म्हारूळ गावातील मंडळाने नियम मोडल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.