गद्दार आमदार बांगर यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

निवडणूक आचारसंहिता सुरू असताना पह्न पे, गुगल पे करा पण बाहेरगावी राहणाऱया मतदारांना मतदानासाठी आणा, असे आमिष दाखवणारे मिंदे गटाचे गद्दार आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात कळमनुरी पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. काल निवडणूक आयोगाने नोटीस बजावून दणका दिला होता, त्यावर बांगर यांनी आज दुपारी खुलासा केला, मात्र तो समाधानकारक नसल्याने निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला.

कळमनुरी शहरात मतदार संघातील कार्यकर्त्यांसमोर बोलताना आमदार संतोष बांगर यांनी बाहेरगावी राहणाऱया मतदारांना ‘फोन पे.. गुगल पे करा.. त्यांना काय लागते ते सांगा गाडय़ा लावा.. काहीही करा.. पण मतदानासाठी आणा’ असे रोख अमिष दाखवले. तसेच बाहेरगावी राहणाऱया मतदारांच्या याद्या दोन दिवसात आमच्याकडे आल्या पाहिजेत असे फर्मानही त्यांनी कार्यकर्त्यांना सोडले होते. बांगर यांनी एका जाहीर कार्यक्रमात असे वक्तव्य केल्याचा  व्हिडिओ शिवसेनेनचे विभागीय नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर शेअर करून निवडणूक आयोग या रोख अमिषावर कारवाई करणार का? असा सवाल केला होता. शिवसेना हिंगोली जिल्हाप्रमुख अजय उैर्फ गोपू पाटील व शिवसेनेचे अजित मगर यांनी कळमनुरी निवडणूक निर्णय अधिकाऱयांकडे तक्रार करून संतोष बांगर यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

शिवसेनेच्या तक्रारीची दखल

शिवसेना पदाधिकाऱयांनी केलेल्या तक्रारीची जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी तात्काळ दखल घेऊन कळमनुरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी प्रतीक्षा भुते यांना आमदार बांगर यांच्याकडून खुलासा मागवण्याचे आदेश दिले होते. निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी आमदार संतोष बांगर यांना 24 तासांत खुलासा करण्यासंदर्भात नोटीस बजावली. संतोष बांगर यांनी आज दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे खुलासा केला. त्यानंतर कळमनुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश बोथीकर यांनी आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात फिर्याद दिली. या फिर्यादीमध्ये संतोष बांगर यांनी आचारसंहिता सुरू असताना मतदारसंघातील व्यक्तींना बक्षिसी देण्याच्या हेतूने लाच देण्याचे कबूल करून ती मिळवून देण्याची तयारी दर्शवल्याचे दिसून येत असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.