दुर्घटनेवेळी स्कॉर्पिओची एअरबॅग उघडली नाही; कानपूरमध्ये आनंद महिंद्रांसह 13 जणांविरुद्ध गुन्हा

दुर्घटनेवेळी स्कॉर्पिओची एअरबॅग न उघडल्याचा आरोप करीत एका तरुणाच्या मृत्यूप्रकरणी कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांच्यासह 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिल्यानंतर मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या वडिलांनी कोर्टाच्या मदतीने गुन्हा दाखल केला आहे.

कानपूरमध्ये राहणाऱया राजेश मिश्रा यांनी 2 डिसेंबर 2020 रोजी आपला एकुलता एक मुलगा डॉ. अपूर्व मिश्रा याच्यासाठी कानपूरमधील तिरुपती ऑटोमधून 17.39 लाखाची एक ब्लॅक स्कॉर्पिओ खरेदी केली होती. 14 जानेवारी 2022 ला अपूर्व मित्रांसोबत कानपूरला येत होता. रस्त्यात धुके जास्त असल्याने गाडी डिव्हाइडरला धडकून अपघात झाला. या अपघातात अपूर्वचा मृत्यू झाला. अपघातावेळी एअरबॅग न उघडल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप राजेश मिश्रा यांनी केला.

अपघातानंतर ऑटो शोरुममधील कर्मचाऱयांनी काहीही ऐकून घेतले नाही. उलट जीवे मारण्याची धमकी दिला, असा आरोप राजेश मिश्रा यांनी केला.

महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा, तिरुपती ऑटोचे मॅनेजर, मुंबईतील महिंद्रा कंपनीचे संचालक चंद्र गुरनानी, विक्रम सिंह मेहता, राजेश जेजुरीकर, अनीश शाह, थोथला नारायणसामी, हैग्रेव खेतान, मुथय्या मुरगप्पन, विशाखा देसाई, निसबाह गोदरेज, सिखा शर्मा, विजय शर्मा यांच्याविरुद्ध फसवणूक, जीवे मारण्याची धमकी यांसारख्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.