
अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथून जाणार्या 361 राष्ट्रीय महामार्गावरील बाह्यवळण रस्त्यावर बुधवारी रात्री 11.30 वाजता मालवाहू आयशर टॅम्पो व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीवरील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची अहमदपूर पोलिसात अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील हगदळ येथील पवन भानुदास डुरे (वय 30, रा. हगदळ ता. अहमदपूर) व रणजित चंद्रकांत मुंढे (वय 24, रा. हगदळ ता. अहमदपूर) हे दोन युवक काही कामानिमित्त दुचाकीवर शिरूर ताजबंद येथे गेले होते. तेथील आपले काम आटपून शिरूर ताजबंद येथून गावातून ते हॉटेल शिवनेरी समोरून लातूरकडे जाणार्या 361 राष्ट्रीय महामार्गावरील बाह्यवळण रस्त्यावरून महामार्गावर लातूरकडे जात होते. लातूरकडून नांदेडकडे येत असलेला मालवाहू आयशर यांची समोरासमोर रात्री 11.30 वाजता धडक झाली. यात दुचाकीवरील दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे.
अपघात एवढा भयंकर होता की आयशर टॅम्पोने धडक दिल्यानंतर दुचाकी फरपटत जात असताना घर्षण होऊन पेट घेतला. त्यात दुचाळी संपूर्ण जळून खाक झाली असून, आयशर टॅम्पो पलटी खाऊन बाजूच्या रोडवर जाऊन पडला. या अपघाताची घटना अहमदपूर पोलिसांना समजताच तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा करून दोन्ही मृतांचे शासकीय ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्यावर हगदळ येथे गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची अहमदपूर पोलिसात अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.