जेलमधून निवडणूक लढवू शकता, जामिनाची आवश्यकता नाही; हायकोर्टाची भाजप नेते दिगंबर अगवणेंना चपराक

निवडणूक लढवणे हा काही तुमचा मूलभूत अधिकार नाही. जेलमधूनही तुम्हाला निवडणूक लढवता येईल, यासाठी जामिनाची आवश्यकता नाही, अशी उच्च न्यायालयाने भाजप नेते दिगंबर अगवणेंना चपराक दिली.

दिगंबर अगवणे यांच्याविरोधात तब्बल 12 गंभीर गुह्यांची नोंद आहे. त्यांना सातारा, फलटण येथून निवडणूक लढवायची आहे. त्यासाठी त्यांना जामीन हवा होता. अगवणे यांनी जामिनासाठी केलेल्या याचिकेवर न्या. मनीष पितळे यांच्या एकल पीठासमोर सुनावणी झाली. न्या. पितळे यांनी वरील खडेबोल सुनावत अगवणे यांची मागणी फेटाळून लावली. अगवणे यांच्याकडून अॅड. आशीषराजे गायकवाड, अॅड. उज्ज्वल कुमार चव्हाण यांनी बाजू मांडली.

तुम्ही मुख्यमंत्री नाही आहात

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मलाही विधानसभा निवडणुकीसाठी जामीन मंजूर करावा, असा युक्तिवाद अगवणे यांच्याकडून करण्यात आला. यावर न्यायालय संतप्त झाले. तुम्ही मुख्यमंत्री किंवा कोणत्या राष्ट्रीय पक्षाचे प्रमुख नाही आहात. तुम्हाला विशेष सवलत देता येणार नाही, असे न्यायालयाने अगवणे यांना फटकारले.

काय आहे प्रकरण

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अगवणे यांना ईडीने जानेवारी 2024 मध्ये अटक केली. हत्येचा प्रयत्न, अपहरण यासह अन्य गुह्यांची अगवणे यांच्याविरोधात नोंद करण्यात आली आहे. त्यांना ‘मोक्का’ही लावण्यात आला आहे. मात्र भाजपचे  माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या तक्रारीमुळे माझ्यावर कारवाई झाली आहे, असा दावा अगवणे यांनी केला आहे.

ईडीचा जामिनाला विरोध

अगवणे यांच्याविरोधात गंभीर गुह्यांची नोंद करण्यात आली आहे. काही गुह्यांचा तपास सुरू आहे. अगवणेंना जामीन मंजूर केल्यास समाजाला साक्षीदारांना धोका होऊ शकतो, असा युक्तिवाद करत ईडीचे वकील संदेश पाटील यांनी अंतरिम जामिनाला विरोध केला. तो न्यायालयाने मान्य केला.