आधी घरात चोरी, नंतर मागितली माफी, चोरांच्या कृतीने जोडपं चक्रावल, वाचा नेमकं काय घडलं?

उत्तरप्रदेशातील मेनपुरीमधून चोरीची अनोखी घटना समोर आली आहे. एका सेवानिवृत्त शिक्षिकेच्या घरी चोरी झाली. शुक्रवारी सायंकाळी उशिरा मास्क घातलेल्या तीन तरुणांनी एका सेवानिवृत्त शिक्षिकेच्या घरातून बंदुकीचा धाक दाखवून 10 लाख रुपयांचा ऐवज लुटला. मात्र निघताना या चोरांनी अशी कृती केली की सर्वांनाच आश्चर्य वाटले.परत जाताना चोर निवृत्त शिक्षिका आणि त्यांच्या पतीच्या पाया पडले.

कोतवाली भागातील कृष्णा नगर येथील रहिवासी असलेल्या सेवानिवृत्त शिक्षिका स्नेहलता यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी तीन मुखवटा घातलेले बदमाश घरात घुसले होते. त्यांनी शिक्षिका आणि त्यांच्या पतीला बंदुकीचा धाक दाखवला. दागिने व काही रोख रक्कम मिळून एकूण 10 लाख रूपयांचा ऐवज चोरण्यात आला. संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून रात्री साडे दहापर्यंत चोरांनी घराची उलथापालथ केली. ही उलथापालथ केल्यानंतर चोरांनी जोडप्याची माफी मागितली. ‘ आम्हाला माफ करा… आम्ही नाईलाजाने चोरी करत आहोत, खूप भूक लागली असल्याने बर्फीचा पुडा देखील सोबत घेऊन जात आहोत,’ असे म्हणत चोरांनी तेथून पळ काढला. जाता जाता बंदुकीचा धाक दाखवत आवाज केल्यास गोळी घालू, अशी धमकीही दिली.

घडलेल्या प्रकारानंतर शिक्षिका व त्यांच्या पतीने त्यांच्या मुलाला व भाच्याला चोरी झाल्याची माहिती दिली. भाच्याने दिलेल्या सल्ल्यानुसार या जोडप्याने पोलिसांत तक्रार दाखल केली.