बुलेट ट्रेनच्या कामाला वेग येणार, शंभर टक्के भूसंपादन पूर्ण

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला आणखी वेग येणार आहे. बुलेट ट्रेनसाठी अवश्यक असलेली महाराष्ट्र, गुजरात राज्यांसह दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांतील शंभर टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. त्यानुसार तब्बल 1389.49 हेक्टर जमीन ताब्यात मिळाली आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरातमधील 951.14 हेक्टर, महाराष्ट्रातील 429.71 हेक्टर तर दादरा-नगर हवेलीमधील 7.90 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करायचे होते. वर्षभरापूर्वी गुजरातमधील संपूर्ण जमिनीचे अधिग्रहण झाले होते. मात्र महाराष्ट्रात केवळ 96 टक्के भूसंपादन पूर्ण झाले होते. त्याला वेग देण्यासाठी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने भूंसंपादनावर भर देत ते शंभर टक्के पूर्ण केले आहे. त्याबाबतचे ट्विट रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले आहे.

आतापर्यंत मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे 120 किमीचे गर्डर लाँच करण्यात आले असून 271 किमीचे पियर कास्टिंग पूर्ण झाले आहे. जपानच्या शिंकानसेनमध्ये वापरल्या जाणाऱया एमएएचएसआर कॉरिडॉर ट्रक सिस्टीमसाठी पहिले प्रबलित काँक्रीट (आरसी) ट्रक बेड टाकण्याचे काम सुरत आणि आणंद येथे सुरू आहे. सहा नद्यांवरील पुलाचे काम पूर्ण केले आहे.

समुद्राखालील रेल्वे बोगद्याचे काम सुरू
महाराष्ट्रातील बीकेसी ते शिळफाटा दरम्यान 21 किमी लांबीच्या बोगद्याचा एक भाग असलेल्या देशातील पहिल्या 7 किमीच्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याच्या कामाची सुरुवात झाली आहे. मुंबई एचएसआर स्थानकाच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू करण्यात आले आहे.