बुलढाण्यात महायुतीत वादाची ठिणगी

बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. मिंधे गटाने तिथे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी दिली असतानाही भाजपकडून माजी आमदार व लोकसभा निवडणूक प्रभारी विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावरून मिंधे आणि भाजपात खडाजंगी सुरू झाली आहे.

बुलढाणा मतदारसंघ आपल्याकडेच रहावा यासाठी मिंधे गट सुरुवातीपासूनच आग्रही आहे. बुलढाण्यात भाजपच्या हालचाली सुरू झाल्या तेव्हा मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाण्यातून लोकसभेसाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच मिंधे गटाने त्यांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली. त्यात प्रतापराव जाधव यांना बुलढाण्यातून उमेदवारी दिली गेली. असे असतानाही भाजपाकडून विजयराज शिंदे यांनी अर्ज दाखल करून मिंधे गटाला डिवचले आहे. प्रतापराव जाधव यांच्याकडून भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले जात नसून बॅनरवर त्यांचे फोटो जाणीवपूर्वक लावले जात नाहीत, असा शिंदे यांचा आरोप आहे.