Buchi Babu Cricket Tournament – इशान किशनचं तुफान, सलग षटकार खेचत ठोकलं दणदणीत शतक

हिंदुस्थानच्या संघातून वगळण्यात आल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून इशान किशन चर्चेचा विषय ठरला होता. मात्र त्याने बुची बाबू स्पर्धेत झारखंड संघाकडून खेळताना षटकार चौकारांची तुफान आतषबाजी करत आपले नाणे खणखणीत वाजवले.

बुची बाबू स्पर्धेत झारखंडविरुद्ध मध्य प्रदेश यांच्यामध्ये सामना सुरू आहे. मध्य प्रदेशने प्रथम फलंदाजी करताना 225 धावा केल्या. शुभन कुशवाह (84 धावा) आणि अरहन अकील (57 धावा) यांच्याव्यतिरिक्त इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या करता आली नाही. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या झारखंड संघातील फलंदाजांना सुद्धा लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. मात्र इशान किशनने एका बाजूने खिंड लढवत षटकार आणि चौकारांची तुफान आतषबाजी केली. इशान किशनने मध्य प्रदेशच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. त्याने 5 चौकार, 10 षटकार आणि 107 च्या स्ट्राइक रेटने 86 चेंडूत शतक ठोकले. विशेष म्हणजे सलग दोन षटकार ठोकत त्याने आपले शतक पूर्ण केले. इशानच्या वादळी खेळीमुळे झारखंड संघाने आपल्या पहिल्या डावात 7 विकेट गमावत 277 धावा केल्या आहेत.